पिंपरी – चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये आज, शुक्रवारी महत्त्वाची बैठक झाली. यावेळी युतीसाठी चर्चा सुरू असून आम्ही सकारात्मक आहोत, असे भाजपकडून सांगण्यात आले. तर जागांबाबत भाजपकडे प्रस्ताव ठेवल्याचे शिवसेनेने सांगून युतीबाबतच्या निर्णयाचा चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवला आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून, त्यांना ‘धक्का’ देण्याची रणनिती भाजप-शिवसेनेने ठरवली आहे. त्यादृष्टीने युतीच्या चर्चेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आकुर्डी येथील एका हॉटेलात आज, शुक्रवारी बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेकडून शहर प्रमुख राहुल कलाटे, खासदार आढळराव-पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, अमोल कोल्हे, तर भाजपकडून खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांच्यासह आझम पानसरे आदी उपस्थित होते. यावेळी भाजपकडून ११ प्रभागांतील ४४ जागांवर एकमत झाल्याची माहिती शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली आहे. युतीसाठी चर्चा यापुढेही सुरू राहील. तसेच युतीसाठी आम्ही सकारात्मक आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर मित्रपक्षांसाठी १५, भाजपसाठी ५८ आणि शिवसेनेसाठी ५५ जागांचा प्रस्ताव शिवसेनेने भाजपसमोर ठेवला आहे. त्याबाबत भाजपकडून नक्कीच विचार केला जाईल, असा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. इतर पक्षांतून आलेल्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. निष्ठावान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिली जाईल, असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. काही प्रभागांतील चर्चा स्पष्ट झाली आहे. शिवसेना ही भाजपच्या दारात उभी नसून, तशी आवश्यकताही नाही. युती झाली नाही तर शिवसेनेने ३२ प्रभागांमध्ये १२८ सक्षम उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवली आहे, अशी स्पष्ट भूमिका संपर्क प्रमुख अमोल कोल्हे यांनी मांडली आहे. दरम्यान, शिवसेनेने भाजपसमोर युती झाल्यास संभाव्य जागांबाबतचा प्रस्ताव ठेवून निर्णयाचा चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवला आहे. आता पिंपरी – चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी युती होणार की नाही, हे पुढील चर्चेनंतरच ठरेल, असे सांगितले जात आहे.