पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराला ज्यांनी खतपाणी घातले, ते सर्व मुख्यमंत्र्यांसमवेत व्यासपीठावर बसले होते, असा आरोप शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल कोल्हे यांनी केला आहे. यावेळी कोल्हे यांनी राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यावरही टीका केली.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या जाहीरनाम्याचे आज अमोल कोल्हे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष राहुल कलाटे, आमदार गौतम चाबुकस्वार, खासदार श्रीरंग बारणे आदी उपस्थित होते. यावेळी अमोल कोल्हे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यावर टीका केली. ‘दादा’ आता पुरे झाले, अशा इशाराही कोल्हे यांनी पवार यांना दिला.

पिंपरी-चिंचवडमधील प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेलाही कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी आश्वासने देत असताना, जेवढ्या गोष्टी शक्य आहेत, त्याबाबतच बोलावे, असा टोलाही अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली. भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांत येथील अनधिकृत बांधकामासंबंधी कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही किंवा कोणतीही कारवाई करू शकले नाही. निवडणुकांच्या तोंडावर जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचे काम आणि आश्वासनांचे गाजर दाखवण्याचे काम भाजपकडून केले जात आहे, असा आरोप बारणे यांनी केला.