पिंपळे गुरव, नवी सांगवी, साई चौक, औंध उरो रुग्णालय

भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या परिवारातील दोन विद्यमान नगरसेवकांनी एकाच जागेवर प्रबळ दावा केला आहे. नात्याने ‘काका-पुतण्या’ असलेले हे दोन्हीही नगरसेवक लढण्यावर ठाम असून सध्यातरी कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. आमदारांनी कोणा एकाची बाजू घेण्याचे टाळले असले तरी हा ‘गृहकलह’ वाढू न देण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे. हा तिढा सुटल्यानंतरच पुढील राजकीय समीकरणे आकाराला येणार आहेत. महापौर शकुंतला धराडे यांचे भवितव्यही याच प्रभागात ठरणार आहे.

पिंपळे गुरव, नवी सांगवी, औंध उरो रुग्णालय परिसर, साई चौक, राजीव गांधी झोपडपट्टी, कवडेनगर ते विद्यानगरचा पट्टा, रामनगर असे नव्या प्रभागाचे क्षेत्र आहे. महापौर शकुंतला धराडे, नगरसेवक राजेंद्र जगताप, नवनाथ जगताप, रामदास बोकड, वैशाली जवळकर असे सहा नगरसेवकांचे सध्याचे क्षेत्र नव्या प्रभागात समाविष्ट आहे. सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, ओबीसी महिला आणि अनुसूचित जाती असे चार जागांचे आरक्षण आहे. दाट लोकवस्ती, सोसायटय़ा, बंगले, बैठी घरे, झोपडपट्टीचा काही भाग असलेल्या या प्रभागात बाहेरून येऊन स्थानिक झालेल्या नागरिकांचा कौल निर्णायक ठरणारा आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून हा परिसर ओळखला जात होता. या पट्टय़ातील सर्व नगरसेवक राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले आहेत. तथापि, लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर येथील प्रमुख कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे आता या संपूर्ण पट्टय़ात भाजपचा प्रभाव जाणवत आहे.

वादावर तोडगा नाही

खुल्या गटात नवनाथ जगताप, राजेंद्र जगताप, मारुतराव साळुंके, बाबुराव शितोळे, राहुल जवळकर, शशिकांत राजेगावकर, नीलेश गांगार्डे आदी नावे चर्चेत आहे. राजेंद्र जगताप व नवनाथ जगताप हे काका-पुतणे आहेत. यापूर्वी दोघे वेगवेगळय़ा प्रभागातून निवडून आले होते. यंदा त्यांचा भाग नव्या प्रभागात एकत्रित झाल्याने दोघे ‘आमने-सामने’ आले आहेत. काका राजेंद्रने माघार घ्यावी, असे म्हणणारा तरुणांचा मोठा वर्ग आहे. तर पुतण्या नवनाथने काकासाठी जागा सोडावी, असा सूरही आहे. मात्र, काका-पुतणे कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. त्यामुहे येथे तिढा कायम आहे.