आयुक्त, महापौर, नगरसचिवांची सभागृहात फटकेबाजी

पिंपरी पालिका सभेतील अभिरूप सभेत पदाधिकारी व अधिकारी यांच्यात ‘अदलाबदली’ झाल्यानंतर श्रावण हर्डीकर यांनी महापौरांच्या, तर नितीन काळजे यांनी आयुक्तांच्या भूमिकेत येऊन तुफान फटकेबाजी केली. इतर सदस्य व अधिकाऱ्यांनी त्यात भर घालून धमालच केली. सभागृहात सुरुवातीला होणाऱ्या ‘वंदे मातरम्’च्या जागी ‘या रावजी’ ही लावणी आणि समारोपाला राष्ट्रगीताऐवजी ‘झिंग झिंग झिंगाट’ हे गाणे वाजवण्यात आले.

महापालिकेच्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त सभागृहात अभिरूप सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे अध्यक्षस्थान श्रावण हर्डीकर यांच्याकडे होते, तर नितीन काळजे आयुक्त म्हणून सभागृहात बसले होते. हर्डीकर, काळजे यांच्यासह उल्हास जगताप, राजेश लांडे, विजय खोराटे, संजय कांबळे, सतिश इंगळे, महेश डोईफोडे, प्रवीण आष्टीकर, संभाजी ऐवले या अधिकाऱ्यांनी, तर एकनाथ पवार, सीमा सावळे, शीतल िशदे, आशा शेंडगे आदी लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला. जवळपास तासभर चाललेल्या या सभेत सदस्यांनी अधिकाऱ्यांचे तर अधिकाऱ्यांनी सदस्यांचे उट्टे काढण्याची एकही संधी सोडली नाही. या वेळी केलेल्या शेरेबाजी, नक्कल व खुसखुशीत संवादांमुळे सभेत रंगत आली.

पंतप्रधान आवास योजनतील २५ टक्के घरे महापालिकेचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांना देण्यात यावीत, पालिकेतील प्रत्येक टेबलवर सीसीटीव्ही बसवण्यात यावेत, नगरसेवकांसाठी विमानसेवा सुरू करावी, प्रतिमहिना एक लाख रुपये वाहनभत्ता मिळावा, पालिकेच्या उपाहारगृहात सायरन बसवण्यात यावेत, पुरेसा पाऊस पडूनही पाण्याच्या तक्रारी वाढत असल्याने नेमके पाणी कोठे मुरते आहे, याचा शोध घेण्यासाठी सल्लागार नेमावेत, सततच्या वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून रावेत ते पुणे असा जलवाहतूक मार्ग कार्यान्वित करावा, असे ठराव सभेत मंजूर करण्यात आले. सभा सुरू होण्यापूर्वी ‘या रावजी’ हे गाणे, तर सभा संपत असताना ‘झिंगाट’ हे गाणे लावले होते.