एक हजार जणांच्या रक्तदानाचे उद्दिष्ट

पिंपरी पालिकेच्या वर्धापनदिनी प्रभागनिहाय स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्या दिवशी एक हजार नागरिक रक्तदान करतील, असे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे.

पिंपरी पालिकेचा ३५वा वर्धापनदिन ११ ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजनाची बैठक महापौरांच्या अध्यक्षतेखाली झाली. सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सहआयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क्रीडा सभापती लक्ष्मण सस्ते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता तापकीर, शहर सुधारणा समितीचे सभापती सागर गवळी, गटनेते सचिन चिखले, कैलास बारणे आदी उपस्थित होते.

बैठकीतील चर्चेत गुणवंत कामगारांचा सत्कार, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा गौरव, विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आदी भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी झालेले बहुतांश कार्यक्रम याही वर्षी घेण्यात येणार आहेत. त्याव्यतिरिक्त, शहरातील प्रत्येक प्रभागात स्वच्छता मोहीम घेण्याचा संकल्प मांडण्यात आला आहे. प्रभागांमध्ये ‘स्वच्छ प्रभाग’ अशी स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्वच्छता मोहिमेत नगरसेवक व अधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुख्य प्रशासकीय इमारतीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, त्यामध्ये किमान एक हजार जणांनी रक्तदान करावे, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. एखाद्या मोठय़ा प्रकल्पाची सुरुवात वर्धापनदिनाच्या निमित्ताने व्हावी, अशी अपेक्षाही सदस्यांनी व्यक्त केली. पिंपरी पालिका भारतीय जनता पक्षाकडे आल्यानंतर पहिलाच वर्धापनदिन साजरा होणार आहे. त्यामुळे भाजपच्या वर्तुळात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. वर्धापनदिनाचा ‘राजकीय उत्सव’ करण्याचा काहींचा मनोदय दिसून येत आहे.

[jwplayer PGRFWD2l]