लोकप्रतिनिधींच्या उद्योगांमुळे अधिकारीही वैतागले

साडेचार वर्षे प्रभागातील कामांकडे फारसे गांभीर्याने लक्ष न देणारे नगरसेवक निवडणुकांच्या तोंडावर मात्र भलतेच कामाला लागले आहेत. प्रभागातील कामे अपूर्ण राहिल्याची व अधिकारी दाद देत नसल्याची तक्रार आयुक्तांकडे करून त्यांना समक्ष पाहणीसाठी बोलावण्याचा ‘हट्ट’ सर्वपक्षीय नगरसेवक करू लागले आहेत. आयुक्तांसमवेत ‘चमकोगिरी’ करून प्रसिद्धी मिळवण्याबरोबरच मतदारांना आपली नसलेली कार्यक्षमता दाखवून देण्याच्या नगरसेवकांच्या या उद्योगामुळे आयुक्तांना मात्र इतर कामे सोडून पाहणी दौरेच करावे लागत आहेत. आयुक्तांसमवेत जाणे भाग असल्याने अधिकारी वर्ग अशा पाहणी दौऱ्यांना चांगलाच वैतागला आहे.

पिंपरी पालिकेच्या निवडणुकांना जेमतेम सहा महिन्यांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे विद्यमान ‘नगरसेवक मंडळी’ निवडणुकांच्या कामाला लागली आहे. आपण पाच वर्षांत किती कामे केली, याचा लेखाजोखा मांडण्याच्या तयारीत ते आहेत. प्रभागातील अपूर्ण कामांसाठी आपण किती पाठपुरावा करतो आहोत, हे दाखवून देण्यासाठी नगरसेवकांनी नामी शक्कल शोधून काढली आहे. आयुक्तांकडे प्रभागातील रखडलेल्या कामांची तक्रार करायची, संबंधित अधिकारी दाद देत नाही, असे सांगून या समस्यांची पाहणी करण्यासाठी थेट आयुक्तांना हट्टाने प्रभागात बोलावून घ्यायचे, असे धोरण सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठेवले आहे. आयुक्त एकदा पाहणीसाठी आले की त्यांच्यासमोरच संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतले जाते. प्रभागातील नागरिकांना आयुक्तांपुढे समस्यांची मांडणी करण्यास पुढे केले जाते, असे प्रकार सुरू आहेत. बऱ्यापैकी अधिकारी आपल्या कामाशी प्रामाणिक नसल्याचे अनेक प्रकरणात दिसून आले आहे. निवडणुकांच्या तोंडावर अधिकारी नगरसेवकांना दाद देत नाहीत, नको असलेली किंवा कटकटीची कामे करण्यात टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा दौऱ्यात अधिकाऱ्यांची जिरवण्याची संधी नगरसेवक व त्यांचे समर्थक कार्यकर्तेही सोडत नाहीत. आयुक्तांसमवेत अधिकाऱ्यांच्या मोटारींचा ताफा असतो. संपूर्ण प्रभागात आयुक्तांबरोबर पाहणी करायची व त्यातून आयती प्रसिद्धी मिळवायची आणि आयुक्तांकडे किती ‘वट’ आहे, हे मतदारांना दाखवण्याची खेळी अनेकांनी केली आहे.

अधिकाऱ्यांना आचारसंहितेची प्रतीक्षा

ज्यांच्या प्रभागात आयुक्त जात नाहीत, ते नगरसेवक आयुक्तांना भंडावून सोडतात. गेल्या काही दिवसात आयुक्तांनी नगरसेवकांच्या हट्टापायी शहराच्या विविध भागात पाहणी दौरे केले आहेत. यापुढेही अनेक ठिकाणी दौरे करण्याची निमंत्रणे ‘पेंडिंग’ आहेत. प्रत्येक ठिकाणी थोडय़ा फार फरकाने सारखीच परिस्थिती आहे. अशा दौऱ्यांना जावे लागणारे अधिकारी मेताकुटीला आले आहेत. कधी एकदा आचारसंहिता लागू होते आणि आपली यातून सुटका होते, यासाठी ते देव पाण्यात घालून बसल्यासारखी परिस्थिती आहे.