काश्मीर हल्ल्याचे पिंपरी महापालिका सभेत पडसाद;
पाकिस्तानचा निषेध करून सभा तहकूब

काश्मीरच्या उरी लष्करी तळावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला झाला, त्याचे देशभर पडसाद उमटले. पिंपरी पालिकेच्या सभेतही मंगळवारी सर्वपक्षीय सदस्यांनी ‘मन की बात’ बंद करा, पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा आणि तो देश नेस्तनाबूत करा, अशा आशयाच्या तीव्र भावना सभेत व्यक्त केल्या. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, त्यांच्या कुटुंबातील सदस्यास पालिकेने नोकरी द्यावी, अशा सूचनाही सभेत करण्यात आल्या.

महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अ‍ॅड. गोरक्ष लोखंडे यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याची, तसेच या भ्याड हल्ल्याचा निषेध करणारी सूचना सभेत मांडली, त्यास रामदास बोकड यांनी अनुमोदन दिले.

या विषयावर चर्चा करण्याची सदस्यांची मागणी महापौरांनी मान्य केली. सुलभा उबाळे, चंद्रकांता सोनकांबळे, अमिना पानसरे, भारती फरांदे, सुजाता पालांडे, बाबा धुमाळ, विनोद नढे, राजेंद्र काटे, योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, सीमा सावळे, आशा शेंडगे, आर. एस. कुमार, तानाजी खाडे, सुरेश म्हेत्रे आदींनी मनोगत व्यक्त केले. पक्षनेत्या मंगला कदम यांनी सभागृहाच्या वतीने शहिदांना श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करून ही सभा तहकूब करण्याची मागणी कदम यांनी केल्यानंतर महापौरांनी २८ सप्टेंबपर्यंत ही सभा तहकूब केल्याचे जाहीर केले.