पिंपरी प्राधिकरणाचा कारभार

अस्तित्व टिकवण्यासाठी झगडणाऱ्या पिंपरी नवनगर विकास प्राधिकरणाने सन २०१६-१७ आर्थिक वर्षांत भांडवली खर्चासाठी केलेल्या १३१ कोटी रुपयांच्या तरतुदीमधून विकासकामांसाठी अवघे ३५ कोटी रुपये खर्च केले आहेत. कोटय़वधी रुपयांच्या ठेवी आणि १०३ टक्के महसुली जमा असूनही त्या तुलनेत विकासकामे करण्यात प्राधिकरणाला यश आलेले नाही. भांडवली तरतुदीमधील ९६ कोटी रुपये इतकी रक्कम प्राधिकरणाने केवळ भूसंपादनावर खर्च केली आहे.

पिंपरी प्राधिकरणाने ३०२ कोटींचा अर्थसंकल्प प्राधिकरण सभेला सादर केला होता. सुधारित अर्थसंकल्पामध्ये हा खर्च १७६ कोटी ८८ लाख प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र प्राधिकरणाने विकासकामे करण्याचे नियोजन केले नसल्याचे ताळेबंदपत्रावरुन स्पष्ट होत आहे. जानेवारी अखेपर्यंत प्राधिकरणाकडे १०३ टक्के म्हणजेच ३७ कोटी इतकी महसुली जमा झाली आहे. तर, १५ कोटी रुपयांची भांडवली जमा झाली आहे. प्राधिकरणाचा महसुली खर्च वर्षांला फक्त आठ कोटी रुपये कमी आहे. जानेवारी अखेपर्यंत प्राधिकरणाने भांडवली खर्चामधील ८६ टक्के तरतूद खर्ची घातली आहे. यामधील ९६ कोटी १८ लाख रुपये तरतूद भूसंपादनासाठी देण्यात आली आहे.

बोऱ्हाडेवाडी येथील ४८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन प्राधिकरणाने त्या निधीमधून केले आहे. पिंपरी प्राधिकरणाकडून ४१२ कोटी रुपयांच्या ठेवी विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून प्राधिकरणाला वर्षांकाठी २८ कोटी रुपयांचे व्याज मिळते. निधीचा विचार करता

भरपूर निधी असलेल्या प्राधिकरणाने विकासकामांचे नियोजन मात्र योग्यप्रकारे केलेले नाही. गरज नसलेली कामे काढून पैशांची उधळपट्टी प्राधिकरणाकडून केली जात असल्याचा आरोप प्राधिकरणावर होत आहे.

आवश्यक सुविधा नाहीत

वाल्हेकरवाडीतील गृहप्रकल्पाचे पिंपरी प्राधिकरणाने हाती घेतलेले काम प्रगतिपथावर असल्याचे अधिकारी सांगत असले तरी या कामाची गती कमीच आहे. याशिवाय काही पेठांमध्ये विरंगुळा केंद्र, थीम पार्क सारखी काही कामे सुरु आहेत. स्वच्छता गृह, भाजी मंडई आदींसारखी कामे करण्याकडे प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.