पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक खुनाचे रहस्य पोलिसांनी उलगडले आहे. काही दिवसांपूर्वी भोसरीतील एका नाल्यात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मात्र या महिलेबद्दलची फारशी माहिती पोलिसांच्या हाती लागली नव्हती. मात्र केवळ या महिलेच्या पैंजणावरुन या खुनाचा तपास करत पोलिसांनी खुन्याला अटक केली. विशेष म्हणजे मृत महिलेच्या पतीनेच तिचा खून केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा दिवसांपूर्वी भोसरीतील एका नाल्यामध्ये पोलिसांना महिलेचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह पोत्यात बांधून नाल्यात टाकण्यात आला होता. यानंतर काही दिवसांनी पोलिसांना मयत महिलेची ओळख पटली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मात्र कुठलाही ठोस पुरावा नसताना, केवळ मयत प्रमिला यांच्या पैंजणावरील बी.एस या ट्रेडमार्कवरून ही महिला उत्तर प्रदेश येथील असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले. यानंतर अधिक तपास केल्यावर, महिलेचाच पती (विनोद जैसवार, वय ३० मूळ रा. उत्तर प्रदेश) यानेच ही हत्या केल्याचे उघड झाले.

दिनांक २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता आरोपी विनोद हा पत्नी, मुलगा आणि भाऊ राजन जैसवार यांना घेऊन तो काम करत असलेल्या दुकानात आला होता. यानंतर त्याने भावाला आणि मुलाला बाहेर थांबायला सांगितले आणि पत्नीला आत घेऊन गेला. यानंतर त्याने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर विनोदने भावाच्या मदतीने दुकानाच्या शेजारीच असलेल्या नाल्यात पत्नीचा मृतदेह फेकून दिला. ही हत्या घरगुती भांडणामधून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. विनोदने पत्नीसोबतच सासऱ्याचीही हत्या केल्याचा संशय पिंपरी पोलिसांनी व्यक्त केला आहे. याचा तपास उत्तर प्रदेश पोलीस करत आहेत.