पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथील उच्चभ्रू वसाहतीतील पोलीस अधिकाऱ्याच्या घरावरच चोरट्यांनी डल्ला मारला आहे. चोरट्यांनी तीन तोळे सोने आणि एक लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. आज पहाटे चोरी झाल्याची घटना उघडकीस आले. दरम्यान, पोलिसांनी संशयावरून सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई येथे सहायक पोलीस निरीक्षक पदावर काम करणाऱ्या विलास पुजारी यांच्या घरी आज पहाटे चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी तीन तोळे सोने आणि एक लाखांची रोकड पळवली आहे. विलास पुजारी हे कुटुंबीयांसोबत एका लग्नाच्या सोहळ्यासाठी बाहेरगावी गेले होते. पुजारी यांचा भाचा त्यांच्यासोबत राहतो. तो काल सायंकाळी सहा वाजता कामावर गेला होता. त्यामुळे घरात कोणीच नव्हते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांचे घर साफ केले. पुजारी यांचा भाचा पहाटेच्या सुमारास कामावरून परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे ज्या लॉकरमधून दागिने आणि पैसे चोरीला गेले, त्याच लॉकरमध्ये सहायक पोलीस निरीक्षक पुजारी यांचे पिस्तुल होते. ते इतर ठिकाणी फेकून दिले होते. घरात तपासणी करताना ते पिस्तूल पोलिसांना सापडले. या घटनेची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.