पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. पिंपळे गुरवमधील पवना नगर तीन या गल्लीतील संपूर्ण रस्ता महापालिकेने खोदून ठेवला असून भरपावसात ड्रेनेज लाईन बदलण्याच्या महापालिकेच्या अट्टहासामुळे नागरिकांची दयनीय अवस्था झाली आहे.

पिंपळे गुरवमधील पवना नगर गल्ली नंबर तीन येथे रस्ता खोदण्यात आला आहे. ड्रेनेज लाईन (मलनि:सारण वाहिनी) बदलण्यासाठी जेसीबीने हा रस्ता खोदण्यात आला आहे. मात्र दिरंगाईच्या कारभारामुळे हे काम हाती घेताना पावसाळा उजाडला. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. खोदकामामुळे रस्त्यावर माती पसरली असून पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला आहे. गेल्या ५ ते ६ दिवसांपासून हे काम संथगतीने सुरु असून चिखलातून मार्ग काढताना स्थानिकांना मनस्तापाचा सामना करावा लागतो. चिखलामुळे पाय घसरून पडण्याची किंवा दुचाकी घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. या कामामुळे स्थानिकांनी गल्लीबाहेरच दुचाकी आणि चार चाकी लावणे पसंत केले आहे. महापालिकेच्या या कारभारावर स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यात ड्रेनेज लाईन बदण्याचे काम हाती घेण्यात कोणते शहाणपण असा संतप्त सवाल स्थानिक विचारत आहे.