पिंपरी पालिका शिक्षण मंडळातील गैरव्यवहाराविषयी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश राज्यशासनाने आयुक्त राजीव जाधव यांना दिले होते. मात्र, आयुक्तांनी त्या आदेशांना केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नगरसेवक बाबा धुमाळ यांनी केला आहे.
पिंपरी शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी आशा उबाळे यांच्या गैरकारभाराविषयी आपणाकडे वारंवार तक्रार केली. तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही, असे धुमाळ  यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. सभापतींच्या केवळ तोंडी आदेशानुसार प्रशासन अधिकाऱ्यांनी १० कोटी रूपये वर्ग केले आहेत. अशा अनेक गोष्टी त्यांनी बेजबाबदारपणे केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्यामार्फत केलेल्या मागणीवरून बदलीची कारवाई करावी, अशी तीन पत्रे नगरविकास व शासनाने महापालिकेला पाठवली आणि चौकशी करून कारवाई करण्याचे आदेशही दिले. मात्र, तरीही हेतूपरस्पर दुर्लक्ष करून शासनाच्या आदेशाला टोपली दाखवली आहे, असा आरोप धुमाळ यांनी केला असून अशा अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू, असा  इशाराही दिला आहे.