लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा नऊ वर्षांपासून अंधार कोठडीत पडून आहे. पुतळ्याची योग्य त्या ठिकाणी उभारणी करावी, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्कालीन आयुक्तांना दिले होते. मात्र, आतापर्यंतच्या कोणत्याही आयुक्तांनी गांभीर्याने न घेतल्याने ‘जैसे थे’ परिस्थिती राहिल्याचा आरोप मातंग समाजाच्या विविध संघटनांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. निगडीत नव्हे पिंपरीतील ‘हाफकिन’ येथेच पुतळा स्मारक करावे, अन्यथा राज्यभरात आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
‘हाफकिन’च्या ६५ एकरपैकी पाच एकर जागेत हे स्मारक व्हावे. समूहशिल्प, उद्यान, संशोधन, प्रशिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आदींचा त्यात समावेश असावा, अशी आग्रही मागणी मातंग समाजाच्या ४० संघटनांनी केली आहे. पुतळ्याच्या उभारणीविषयी वर्षांनुवर्षे होत असलेली हेळसांड व चालढकलीवरून संदीपान झोंबाडे, भीमराव पाटोळे, धनंजय भिसे, मारुती दाखले, युवराज दाखले, मनोज कांबळे, प्रल्हाद कांबळे, हरीभाऊ वाघमारे आदींनी पत्रकार परिषदेत तीव्र संताप व्यक्त केला. निगडीतील जागा मिळणार नसल्याचे सांगून अजितदादांनी पर्यायी जागा सुचवण्यास सांगितले होते. त्यानुसार, ‘हाफकिन’ची जागा निश्चित झाली आहे. राज्य शासनाने आचारसंहितेपूर्वी निर्णय घ्यावा, असे झोंबाडे म्हणाले. आयुक्तांनी महापालिका सभेत चर्चा घेऊन प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी केली असून राज्यमंत्री अमित देशमुख यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.