शिवसेना आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पिंपरी पालिकेत स्थायी समितीच्या बैठकांमध्ये वारेमाप वाढीव खर्चास मंजुरी देण्याचा ‘उद्योग’ गेल्या काही दिवसांपासून बिनबोभाट सुरू आहे. याबाबतची लेखी तक्रार शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्याची दखल घेऊन नगरविकास विभागाने पालिकेतील वाढीव खर्चाबाबतचा अहवाल तातडीने पाठवण्याचे आदेश आयुक्तांना दिले.

पिंपरी पालिकेने शहरातील झोपडपट्टय़ांमध्ये वैयक्तिक शौचालये बांधण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला एक कोटी रुपयांचा वाढीव खर्च देण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चार प्रस्ताव घाईने मंजूर करण्यात आले. त्यातील पहिल्या कामात १५ लाख, दुसऱ्या कामात ३० लाख, तिसऱ्या कामात २४ लाख आणि चौथ्या कामात २९ लाख रुपये वाढीव खर्च मंजूर करण्यात आला, अशी माहिती चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात दिली होती. वाढीव रक्कम मंजूर करण्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वारस्य असते, हे वर्षांनुवर्षे सुरू आहे. कोणी भेटायला येत नाही म्हणून किरकोळ प्रस्तावही राखून ठेवला जातो आणि गौडबंगाल असलेले प्रस्ताव तातडीने मंजूर केले जातात, याकडे आमदारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार, शासनाच्या नगरविकास विभागाने याबाबतचा अहवाल पाठवण्याचे आदेश आयुक्त दिनेश वाघमारे यांना दिले आहेत.