सव्वा वर्षे ठरले असताना महापौर धराडे दोन वर्षे पदावर

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदाचे राजकारण अजूनही सुरूच आहे. विद्यमान महापौर शकुंतला धराडे यांना सव्वा वर्षांसाठी महापौरपद दिले असताना दोन वर्षांनंतरही त्या पदावर कायम असल्याचे सांगत या पदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका आशा सुपे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना साकडे घातले आहे. आपल्या पक्षात महिलांना समान न्याय व समान संधी मिळावी, या धोरणानुसार न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सुपे यांनी पवारांकडे केली आहे.

िपपरीत महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या प्रवर्गातील तीनच नगरसेवक िपपरी पालिकेत असून तिघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यापैकी धराडे यांना सव्वा वर्षांसाठी म्हणून प्रथम संधी देण्यात आली. तथापि, त्यानंतरही त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. त्यामुळे उर्वरित रामदास बोकड आणि आशा सुपे या दोन दावेदारांनी आम्हाला संधी द्या, अशी मागणी पक्षाकडे सातत्याने केली. तथापि, पक्षांतर्गत राजकारण व राष्ट्रवादीच्या दृष्टीने असलेली अडचणीची परिस्थिती, यामुळे धराडे यांचा राजीनामा घेतला जात नाही. वास्तविक धराडे व बोकड भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक नगरसेवक आहेत. त्यामुळे सुपे यांना संधी देण्याची मागणी पक्षातील ३२ नगरसेवकांनी यापूर्वीच अजित पवार यांच्याकडे केली होती. सुपे माजी आमदार विलास लांडे यांच्या समर्थक आहेत आणि लांडे यांचे ‘तळ्यात-मळ्यात’ सुरू आहे, असा मुद्दा पुढे करून राष्ट्रवादीतील एका गटाने सुपे यांना महापौरपद मिळू दिले नव्हते. मात्र, लांडे आता पवारांना शरण आले असून राष्ट्रवादीत राहणार असल्याचे पक्षाच्या मेळाव्यातच जाहीर केले आहे. त्यामुळे सुपे यांच्या मागणीला लांडे गटाचे बळ मिळणार आहे. २४ जूनला शरद पवार व अजित पवार शहरात होते. तेव्हा उर्वरित कालावधीसाठी महापौरपदावर काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी सुपे यांनी त्यांच्याकडे केली आहे. याबाबत ‘कारभारी’ अजितदादा काय भूिमका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.