आजपासून शैक्षणिक साहित्याचे वाटप; पिंपळे गुरवला प्रारंभ
पिंपरी महापालिका शिक्षण मंडळाच्या पहिली ते सातवीच्या शाळा बुधवारी (१५ जून) सुरू होत असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिका शाळांचा खाकी अर्धी विजार आणि पांढरा शर्ट हा पूर्वीचा गणवेश बदलण्यात आला असून यंदाच्या वर्षांपासून इंग्रजी माध्यमांच्या शाळांप्रमाणेच गडद निळी विजार आणि पांढरा व निळा मिश्रित शर्ट दिला जाणार आहे. जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांना हा नवा गणवेश मिळणार आहे.
शिक्षण मंडळाचे सभापती चेतन भुजबळ आणि प्रशासन अधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा गणवेश बरेच वर्षे एकसारखाच आहे. त्यामध्ये बदल करण्याचा विचार पुढे आला. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून नव्या रंगाचे गणवेश विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळत नाही, असे प्रकार गेल्या काही वर्षांत अनेकदा घडले आहेत. यंदाच्या वर्षी तसे होणार नाही, याची खबरदारी मंडळाने घेतली असल्याचे भुजबळ व कारेकर यांनी सांगितले. लेखन साहित्य, बूट, मोजे, दप्तर व पुस्तके आदी साहित्य पहिल्या दिवशी दिले जाणार आहे. शहरातील ११ शाळांमध्ये साहित्यवाटपाचे कार्यक्रम होणार आहेत. िपपळे गुरव येथील पालिकेच्या शाळेत मुख्य कार्यक्रम होणार आहे. महापौर, आयुक्त, आमदार, नगरसेवक आदी सर्व उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवसापासून सरसकट १३१ शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी मंडळ प्रशासनाकडून सुरू आहे.