साडेपाचशे स्कूलबसची तपासणीच नाही; परिवहन कार्यालयाकडून फक्त नोटिसा

सुरक्षेच्या दृष्टिने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबसची तपासणी शाळा सुरू होण्याच्या आधी करा, असे न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही पिंपरी शहरातील शाळांच्या विद्यार्थ्यांची बसवाहतूक रामभरोसे सुरू असल्याचे चित्र आहे. शाळा सुरू होऊन दीड महिना उलटून गेल्यानंतरही िपपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ५५६ वाहनांची अद्याप तपासणीच झाली नसल्याचे उघड झाले आहे. तसेच तपासणीसाठी न येणाऱ्या वाहनांना फक्त नोटीस देण्यापलीकडे कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे शहरातील बहुतांश विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

िपपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात िपपरी-चिंचवड शहरासह जुन्नर, आंबेगाव, खेड, लोणावळा, मावळ आदी भागांचाही समावेश होतो. परिवहन कार्यालयाकडे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एक हजार ८७९ वाहनांची नोंद आहे. ही सर्व वाहने स्कूल बस नियमावलीची पूर्तता करीत असल्याचे परिवहन कार्यालयाने प्रमाणित केले आहे. परिवहन कार्यालयाकडील नोंदणीकृत वाहनांशिवाय अनधिकृतपणे विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने तसेच रिक्षांची संख्याही खूप मोठी आहे. त्याकडे मात्र सोयीस्करपणे डोळेझाक केली जात आहे. अनेक वाहने सुस्थितीमध्ये नसतात. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांना ने-आण करणारी वाहने सुस्थितीत असायला हवीत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड होऊ नये यासाठी न्यायालयाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची शाळा सुरू होण्यापूर्वी मे महिन्यातच तपासणी करावी, असा आदेश दिला होता.

िपपरी परिवहन कार्यालयाकडे नोंद असलेल्या वाहनांमध्ये शाळांच्या मालकीची ३९८ वाहने आहेत, तर एक हजार ४८१ वाहने करार पद्धतीने शाळा घेतात. अशा सर्व वाहनांची न्यायालयाच्या आदेशानुसार तपासणी करणे बंधनकारक असताना त्यातील तब्बल ५५६ वाहनांची तपासणीच झाली नसल्याचे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. तपासणीसाठी न आलेल्या वाहनचालकांना फक्त नोटीस देण्याचे सोपस्कर पूर्ण करत वेळ मारून नेण्यात परिवहन कार्यालय यशस्वी झाले आहे. शालेय वाहने सुस्थितीत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ने आण करताना अडचणी उद्भवू शकतात, हे माहिती असूनही परिवहन कार्यालय गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.