लोखंडी सळ्या घेऊन निघालेल्या भरधाव ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने दुचाकी, दोन मोटारी आणि ट्रॅक्टरला धडक दिल्याने तिघेजण जागीच ठार झाले. मृतांत एका शाळकरी मुलासह दोन तरुणांचा समावेश आहे. पिरंगुट येथे लवळे फाटय़ानजीक रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. या अपघातात पाचजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अभिषेक सुरेश दगडे (वय १८, रा. पिरंगुट), समीर संजय उभे (वय १८, रा. वरपेवाडी, भूकुम) आणि ओंकार संतोष जाधव (वय सात, रा. पिरंगुट)अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या अपघातात ट्रकचालक तानाजी पांडुरंग जाधव (वय ३७, रा. लोणी काळभोर) याच्यासह क्लिनर, ट्रॅक्टरचालक आणि विकीकुमार सूरज (वय तीन, रा. उत्तर प्रदेश ) त्याची आई, असे पाचजण जखमी झाले आहेत, अशी माहिती पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांनी दिली.
लोखंडी सळ्या घेऊन निघालेला ट्रक पुणे-कोलाड रस्त्याने रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास निघाला होता.
पिरंगुट येथील घाट रस्त्यावर पौडच्या दिशेने निघालेल्या ट्रकचालकाचा ताबा सुटला आणि बुनिंदा ढाब्यासमोर ट्रकने मोटारीला धडक दिली. त्यानंतर आणखी एका मोटारीला धडक दिली. दैव बलवत्तर होते म्हणून मोटारचालक बचावला. मोटारीच्या पुढील भागाचा चुराडा झाला. त्याचवेळी पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टर आणि दुचाकीला ट्रकने धडक दिली. ट्रॅक्टरमध्ये सिमेंटच्या विटा होत्या. त्यामुळे ट्रकचा वेग कमी झाला आणि ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. अपघाताची माहिती मिळताच पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. अपघातात गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार अभिषेक, समीर आणि ओंकार हे उपचारांपूर्वीच मरण पावले होते.