केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ‘प्लॅस्टिकमुक्त पुणे शहर’ या अभियानात ८०० हून अधिक शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. शनिवारी या मोहिमेला सुरूवात होणार असून त्यात हे विद्यार्थी आपापल्या शाळा वा महाविद्यालयाच्या परिसरातील प्लॅस्टिक कचरा गोळा करतील.
१३ फेब्रुवारीला न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग या शाळेपासून केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या उपस्थितीत सकाळी साडेआठ वाजता मोहिमेची सुरूवात होईल. जावडेकर व बापट हे रमणबाग शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. या दिवशी सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक कचरामुक्त शहराची संकल्पना सांगून ध्वनिचित्रफितींच्या आधारे माहिती दिली जाईल, तसेच हे विद्यार्थी स्वच्छतेचे गीत गाऊन स्वच्छतेची शपथ देखील घेतील. शास्त्रीय पद्धतीने कचरा गोळा करण्यासाठी विद्यार्थ्यांना हातमोजे व टोप्या दिल्या जातील. तसेच विद्यार्थ्यांच्या घरीही प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणे कमी व्हावे व कापडी पिशव्यांचा वापर वाढावा, या उद्देशाने विद्यार्थ्यांना कापडी पिशव्याही वाटल्या जातील. प्रत्येकी २५-२५ विद्यार्थ्यांच्या तुकडय़ांमध्ये विद्यार्थी शाळा व महाविद्यालयांच्या आजूबाजूच्या परिसरात जाऊन प्लॅस्टिक कचरा गोळा करतील व तिथून हा कचरा महापालिकेतर्फे पुनर्निर्मिती प्रक्रियेसाठी संकलित केला जाईल.
१५ फेब्रुवारीनंतर या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जावडेकर यांनी केले आहे. या पूर्वी शिरुर व रत्नागिरीत ही मोहीम राबवण्यात आली असून तिथे प्लॅस्टिक गोळा करण्यास चांगला प्रतिसाद मिळाला. याच धर्तीवर देशभरात ठिकठिकाणी मोहिमांचे आयोजन केले जाईल, अशी माहितीही जावडेकर यांच्यातर्फे देण्यात आली.