पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधानांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे, असे सांगत राजू शेट्टींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या शेतमालास हमी भाव देऊ आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले होते. आजपर्यंत या प्रश्नावर कोणत्याही प्रकारचा निर्णय पंतप्रधानानी घेतला नसून त्यांनी आम्हाला फसवले आहे, अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी पंतप्रधानावर टीका केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आजपासून आत्मक्लेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे ते मुंबई दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या यात्रेला पुण्यातील महात्मा फुले स्मारक येथून सुरुवात झाली .यावेळी तृतीयपंथी लक्ष्मी त्रिपाठी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले देखील सहभागी झाली होती.

यावेळी शेट्टी म्हणाले की, पुण्यापासून आत्मक्लेश यात्रेला सुरुवात झाली आहे. यातून भविष्यात जनआंदोलन उभारले जाणार असून ३० तारखेला राज्यपालांना शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाईल. तसेच सातबारा कोरा करण्यासोबतच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आत्मक्लेश यात्रेची मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना माहिती असूनही त्यांनी संपर्क साधला नाही. यातून राज्य सरकारची मानसिकता दिसते, अशा शब्दांत त्यानी फडणवीसांवर तोफ डागली. या यात्रेमध्ये सदाभाऊ खोत सहभागी झाले नाहीत. याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर शेट्टी म्हणाले की, राज्यात स्वाभिमानी संघटनेचे लाखो कार्यकर्ते असून या यात्रेत देखील हजोरो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. सदाभाऊ यांच्या अनुपस्थितवर मौन बाळगणेच त्यांनी पसंद केले.

यावेळी लक्ष्मी त्रिपाठी यांनी देशातील शेतकरी समाधानी नसून सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले. तसेच निवडणुकीपूर्वी अच्छे दिन येणार हे पंतप्रधानानी जनतेला सांगितले होते. अच्छे दिन आले पण ते फक्त अदानी आणि अंबानी यांचे असे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. आत्मक्लेश यात्रेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. यातील आशिष पाटील या मुलाने वडिलांच्या आत्महत्येला कर्ज आणि सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचे म्हटले. यावेळी त्याने कर्जाने खचलेल्या शेतकऱ्यांना व्यसनाच्या आहारी जाऊन आत्महत्या करू नका, अशी विनंती केली.