पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढत असला, तरी अंदाजपत्रकाच्या प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्न सुरू केले असून ‘जनसहभागातून अंदाजपत्रक’ असे या प्रयत्नांचे स्वरुप असेल.
महापालिकेचे अंदाजपत्रक दरवर्षी तयार होते आणि ते मुख्य सभेने मंजूर केल्यानंतर १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू होते. अंदाजपत्रकाच्या या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग असेल तर ते अधिक उपयुक्त ठरू शकेल या दृष्टीने पुण्यात गेले काही वर्षे प्रयत्न सुरू आहेत. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकाची तयारी आतापासूनच केली जात आहे. सेंटर फॉर एन्व्हॉयर्नमेंट एज्युकेशन (सीईई), तसेच ‘परिसर’ या संस्थांनी या कामात पुढाकार घेतला आहे. नगरसेवक, नागरिकांचे गट, शिक्षणसंस्था यांच्या एकत्रित सहभागातून जनसहभागावर आधारित अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया अधिकाधिक परिणामकारक होऊ शकते. तसेच असे अंदाजपत्रक नागरिकांच्या अधिकाधिक गरजा पूर्ण करू शकते ही गोष्ट लक्षात घेऊन या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.
‘सीईई’ ही राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी संस्था असून ‘परिसर’ ही शहरी वाहतुकीच्या संबंधी काम करणारी संस्था आहे. लोकसहभागावर आधारित अंदाजपत्रक या उपक्रमाला पुण्यात २००६ पासून सुरुवात करण्यात आली आहे. यंदाचे जे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे त्यासाठीही हा उपक्रम राबवण्यात आला होता आणि पुण्यातील शेकडो नागरिकांनी केलेल्या सूचनांनुसार आठशे छोटय़ा मोठय़ा कामांचा समावेश या अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने रस्त्यांच्या बाजूला बाक बसवणे, पदपथ दुरुस्ती, झाडे लावणे, पदपथ तयार करणे, सूचनाफलक लावणे, फेरीवाल्यांची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था आदी अनेक सूचनांचा समावेश होता.
नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी आयोजित कार्यशाळेत प्रामुख्याने जनसहभागावर आधारित अंदाजपत्रकाची प्रक्रिया समजावून दिली जाईल. पुण्यात जो उपक्रम राबवला जातो त्यातील बलस्थाने व त्रुटी यांचा आढावा घेतला जाईल, जनसहभागावर आधारित अंदाजपत्रक प्रक्रियेचा प्रारुप आराखडा तयार करण्याबाबतही मार्गदर्शन केले जाईल. तसेच, नगरसेवक व अभ्यासकांच्या सूचनाही मांडल्या जातील.
नागरिकांच्या सहभागासाठी कार्यशाळा
नागरिकांच्या सहभागाच्या दृष्टीने आणि त्यांना अधिकाधिक माहिती देण्यासाठी २४ मे रोजी एका कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले असून १२ मे पर्यंत संयोजकांशी संपर्क साधून या कार्यशाळेत सहभागी होता येईल. संपर्कासाठी २७२९८८६० आणि २७२९८८६१ असे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.