पुण्यात भाजपला एकहाती सत्ता मिळेल, हा खासदार संजय काकडे यांनी वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे. पुण्यातील निकालांच्या आदल्यादिवशी वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय नेत्यांची मैफल जमली होती. यावेळी सर्व नेत्यांनी या निवडणुकीत आपापल्या पक्षाला किती जागा मिळतील, याबद्दलचा अंदाज वर्तवला होता. सर्व नेत्यांनी एका चिठ्ठीवर हे आकडे लिहून दिले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर या चिठ्ठ्या उघडण्यात आल्या तेव्हा संजय काकडे यांनी भाजपच्या जागांसदर्भात वर्तविलेले अंदाज ९५ ते ९८ टक्के खरा ठरल्याचे दिसले. त्यामुळे आता पुण्याच्या राजकीय वर्तुळात काकडेंचे आकडे कसे जुळले, याची खमंग चर्चा रंगली आहे.  दरम्यान, निकालांविषयी ज्या नेत्याचे अंदाज सर्वाधिक योग्य ठरतील त्याला सर्वपक्षीय नेत्यांकडून चार हजार रूपयांचे बक्षिसही जाहीर करण्यात आले होते. काकडेंनी भाजपच्या जागांसंदर्भात वर्तविलेला हा अंदाज अनेकांना अतिशयोक्ती असल्याचे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात निकालाच्या दिवशी हे अंदाज खरे ठरताना पाहून अनेकजण चक्रावले. दरम्यान, काकडेंचे अंदाज खरे ठरल्याने वाडेश्वर कट्ट्याकडून देण्यात येणारे चार हजार रूपयांचे बक्षिसही काकडे यांनाच मिळाले. संजय काकडे यांनी निवडणुकीपूर्वीच पुण्यात भाजपला एकहाती सत्ता मिळाली नाहीतर , सक्रिय राजकारणातून निवृत्त होईन, असे विधान करून अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या माध्यमातून निवडणुकीदरम्यान वाडेश्वर कट्यावर शहरातील सर्व पक्षीय नेत्यांसमावेत नाश्त्याचे आयोजन केले जाते. यावेळी सर्व राजकीय मतभेद विसरून दिलखुलास चर्चा केली जाते. हे फक्त पुण्यामध्ये होत असून या उपक्रमाचे पुणेकर कौतुकदेखील करतात. यावेळी नेत्यांकडून निवडणुकांविषयीचे अंदाज वर्तविले जातात. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे, काँग्रेस पक्षाचे सतीश देसाई, भाजपचे गोपाल चिंतल आणि राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी आयोजित केलेल्या वाडेश्वर कट्यावर एका मोठ्या कागदावर या नेत्यांनी अंदाज वर्तविले होते. मात्र, प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी भल्याभल्यांचे अंदाज चुकले. फक्त संजय काकडे यांनी अगदी सुरुवातीपासून ९० ते ९५ दरम्यान भाजपच्या जागा महापालिकेत येतील, असा अंदाज पत्रकार परिषदेत वर्तविला होता. काकडे यांनी वाडेशवर कट्यावर भाजपला ९२, राष्ट्रवादी ४२, काँग्रेस १२, शिवसेना १०, मनसे ३ आणि इतर ३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. मात्र, प्रत्यक्षात निकालाचे आकडे पाहता भाजप ९८ , काँग्रेस ९, राष्ट्रवादी ३८, शिवसेना १०, मनसे २, एमआयएम १ आणि चार अपक्ष नगरसेवक निवडून आले. त्यामुळे काकडे यांचा अंदाज सर्वाधिक अचूक ठरला.

दरम्यान, काकडे यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा महापालिका निवडणुकीत देखील पाहण्यास मिळाला आहे. तसेच ज्या प्रकारे मी अंदाज वर्तविले ते तळागाळापर्यंत पक्षाचे काम पाहून वर्तविले होते. वाडेश्वर कट्याच्या उपक्रमाचे कौतूक करावे थोडे आहे. अशा उपक्रमाचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकड़े म्हणाले की, पुणे शहरातील जनतेने भाजपच्या हाती सत्ता दिल्याचा कौल आम्हाला मान्य असून त्यापूर्वी संजय काकडेंनी वर्तवलेला अंदाजाचे गुढ शोधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.