पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मतदान यंत्रात (ईव्हीएम) घोटाळा करून भाजपने निवडणूक जिंकली असल्याचा गंभीर आरोप करत आज शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. महापालिका निवडणुका पुन्हा घेण्यात याव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता काबीज केली. मात्र, त्यानंतर पराभूत उमेदवारांनी भाजपने मतदान यंत्रात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. काही दिवसांपूर्वीच विरोधक आणि पराभूत उमेदवारांनी याविरोधात मोर्चा काढला होता. पुन्हा मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली होती. आज, शनिवारी पुन्हा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. या मोर्चात विविध पक्षांतील पराभूत उमेदवार सहभागी झाले होते. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने मतदान यंत्रात घोटाळा करून ही निवडणूक जिंकली आहे, असा आरोप त्यांनी केला. राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मतदान यंत्रात घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले आहे. हे लक्षात घेता महापालिका निवडणुका पुन्हा घेण्यात याव्यात, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. यापुढील निवडणुकांसाठी बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.