पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून १६२ जागांपैकी ९८ जागी कमळ फुलले आहे. या आकडेवारीवरून महापालिकेमध्ये भाजप चे ४ नगरसेवक स्वीकृत म्हणून जाणार आहे. त्यामध्ये प्रभाग १६ मध्ये गटनेते गणेश बिडकर यांचा रविंद्र धंगेकर यांनी पराभव केल्याने भाजपला धक्का बसला आहे. त्यामुळे बिडकर यांचे स्वीकृत म्हणून पुनर्वसन होणार का अशी चर्चा भाजपमध्ये रंगली आहे.

राज्यामध्ये पार पडलेल्या महापालिका आणि निवडणुकीमध्ये भाजपला क्रमांक एकचा पक्ष म्हणून जनतेने निवडून दिले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे महापालिकेत १६२ जागांपैकी ९८ जागांवर भाजप चे नगरसेवक निवडून आले आहे. या निकालाने पुण्यातील सर्व राजकीय पक्षांना आर्श्चयाचा धक्का बसला असून पुणे शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील प्रभागातून भाजप गटनेते गणेश बिडकर, अपक्ष रविंद्र धंगेकर यांची लढत होणार असल्याने या लढतीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले होते. कारण भाजपचा बालेकिल्ला कसबा असल्याने यामध्ये अगदी सहजपणे बिडकर विजयी होतील असा अंदाज सर्वांचा होता.

मात्र मतदार राजाने रवींद्र धंगेकरांच्या पारड्यात मतदान करून बिडकर यांना घरचा रस्ता दाखविण्याचे काम केले आहे. या पराभवामुळे बिडकरांच्या पुढील वाटचालीस ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र त्यांचे महापालिकेतील सभागृहातील दरवाजे उघडण्याची शक्यता असून भाजप चे ९८ नगरसेवक निवडून आल्याने महापालिका नियमानुसार ३० नगरसेवकामागे १ नगरसेवक स्वीकृत म्हणून सभागृहात जाऊ शकतो. ४ जण स्वीकृत म्हणून निवडून जाणार आहे. यामुळे गणेश बिडकर यांचे स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे. उज्वल केसकर, जोत्स्ना सरदेशपांडे, गोपाल चिंतल, सतीश बहिरट, सुहास कुलकर्णी तसेच बिडकर यांच्यापैकी कुणाला संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.