महापालिका निवडणूक निकालांबाबत शरद पवार यांची टिप्पणी

मैत्री अनेकांशी असते. राजकारणात बोट धरून आलो असे जे सांगतात ते काही खरे नसते. माणसं बोलायला हुशार असतात. पण, त्यांच्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवतात आणि हे पुणेकरांनीही सिद्ध केले आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी महापालिका निवडणूक निकालांबबात सोमवारी टिप्पणी केली.

शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे प्रतिभा पवार यांच्या हस्ते प्रसिद्ध पाश्र्वगायिका अनुराधा पौडवाल यांना राम कदम कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापौर प्रशांत जगताप, ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग, ज्येष्ठ संगीत संयोजक इनॉक डॅनियल, महाराष्ट्र राज्य सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, राम कदम यांचे पुत्र विजय कदम, कन्या श्यामा गायकवाड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया या वेळी उपस्थित होते. सुधीर गाडगीळ यांनी शरद पवार, प्रतिभा पवार आणि अनुराधा पौडवाल यांच्याशी संवाद साधला.

राजकारणात विचारांमध्ये मतभिन्नता असली तरी व्यक्तीविषयी द्वेष असता कामा नये हे सूत्र मी पाळले. त्यामुळे सर्व पक्षांत माझे चांगले संबंध आहेत. परंतु, त्याचा राजकारणाशी संबंध नसतो, असे सांगताना पवार यांनी वाडेश्वर कट्टय़ाचा उल्लेख केला. महाराष्ट्राची संस्कृती इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. भावी पिढीनेही हा संस्कार पुढे नेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पवार यांनी लक्ष्मणशास्त्री जोशी, गोविंद तळवलकर आणि गदिमांच्या आठवणींना उजाळा दिला. राजकारणात अनेकदा लोकांची कामे होत नाहीत. त्याला कारणेही तशीच असतात.

अशा वेळी संबंधित व्यक्ती रागावण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला नावाने हाक मारली की त्याचा राग नाहीसा होतो. नाव लक्षात ठेवण्याचा राजकारणात असा फायदा होतो, असेही पवार यांनी सांगितले. आत्मचरित्रातून ती व्यक्ती नीटपणे समजत असल्याने मला आत्मचरित्र वाचायला आवडते असे सांगून पवार यांनी पं. भीमसेन जोशी आणि किशोरी आमोणकर हे आवडते गायक कलाकार असल्याचे सांगितले.

माझ्या गाण्याला घरातून विरोध होता. परंतु, माझी आवड पाहून सर्वाकडून प्रोत्साहन मिळाले. अनेकांबरोबर गायनाची संधी लाभली आणि रसिकांचे प्रेमही मिळाले, अशी भावना अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केली. ‘काळ्या मातीत मातीत तिफन चालते’ हे गीत त्यांनी सादर केले.

मलाही कळत नाही

विवाहाला ५० वर्षे झालेली असताना साहेबांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला कळते का, असे सुधीर गाडगीळ यांनी विचारताच प्रतिभा पाटील यांनी ‘नाही’, असेच सांगितले. गुगली बॉलरच्या मुलीशी लग्न करताना एकदा विकेट पडली आणि आज तिनेच माझी विकेट काढली, अशी कोटी शरद पवार यांनी केली. पत्नीच्या साडीखरेदीसाठी तुम्ही वेळ काढता का, असे विचारताच पवार म्हणाले, माझ्या बायकोने नेसलेली प्रत्येक साडी मी खरेदी केली आहे. एक दिवस तिच्यासाठी दिला की आठवडय़ातले सहा दिवस कोठेही हिंडायला मी मोकळा असतो.