राज्यात मतदानाचे वातावरण असून ठिकठिकाणी ‘मतदार राजा’ला मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले जात आहे. मतदानासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याचा दावा केला गेला होता. पण आयोगाच्या दाव्याला तडा जाणारे प्रकरण पुण्यात उघडकीस आले आहे. पुण्याच्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावर लावली जाणारी शाई पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक १५ मधील आदर्श महाविद्यालयात मंजुश्री जोशी यांनी सकाळी साडेसात वाजता मतदान केले. पण काही वेळाने हात धुतल्यानंतर त्यांच्या बोटावरील शाई पुसली गेली. घडलेला प्रकार निवडणूक अधिकाऱयांच्या लक्षात आणून देण्यासाठी जोशी पुन्हा मतदान केंद्रावर गेल्या. निवडणूक अधिकाऱयांनी शाई बदलून पुन्हा जोशी यांच्या बोटावर शाई लावण्यात आली. पण नव्याने लावण्यात आलेली शाई देखील पुसली गेली. पाण्यात हात धुतल्यानंतर अगदी सहजपणे बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

आदर्श महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या मंजुश्री जोशी मतदान केल्यानंतर सेल्फी काढून तो फेसबुकवर अपलोड केला होता. पण हात धुतल्यानंतर बोटावरची शाई निघून गेल्याचे लक्षात आले. फेसबुकवर अपलोड केलेला फोटो पुरावा दाखवून मंजुश्री यांनी बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. निवडणूक आयोगाच्या निष्काळजीपणावर मंजुश्री यांनी नाराजी व्यक्त केली. बोटावरची शाई पुसली गेली तर एकच मतदार अनेकदा मतदान करण्याची शंका निर्माण होते. त्यामुळे बोगस मतदान होण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.