काही उमेदवारांचा प्रतिज्ञापत्रात निर्धन असल्याचा दावा 

महापालिका निवडणुकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेले तब्बल २६१ उमेदवार हे कोटय़धीश असून या उमेदवारांची सरासरी मालमत्ता साधारणत: चार कोटी रुपयांच्या आसपास आहे. हे उमेदवार कोटय़धीश, अब्जाधीश असले तरी काही उमेदवारांनी त्यांच्यावर कोटय़वधी रुपयांचे कर्ज असल्याचेही जाहीर केले आहे. या कर्जदारांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गणेश बीडकर हे पुढे असून त्यांच्या नावावर ११ कोटी ९२ लाख रुपयांचे दायित्व आहे. तर सहा उमेदवार निर्धन असल्याचेही उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी येत्या मंगळवारी (२१ फेब्रुवारी) मतदान होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एक हजार ९० उमेदवारांनी संपत्तीचे विवरणपत्र आणि अन्य माहिती प्रतिज्ञापत्रातून सादर केली आहे. या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास आणि पडताळणी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉम्र्स (एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच या दोन संस्थांनी केली आहे. त्यामध्ये कर्जदार उमेदवारांचीही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोटय़वधी रुपयांची मालमत्ता त्यांच्याकडे असूनही व्यावसायिक कारणांसाठी ते कोटय़वधी रुपयांची रक्कमही वित्तीय कंपन्यांना देय (लायबिलिटीज्) असल्याचे दिसत आहे.

दहा प्रमुख कर्जदार उमेदवारांमध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन, शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तर काँग्रेसच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. भाजपचे महापालिकेतील गटनेता गणेश बीडकर यांची एकूण मालमत्ता २३ कोटी ३० लाख असून त्यांची देय रक्कम ११ कोटी ९२ लाख एवढी आहे. भारतीय जनता पक्षाने पुरस्कृत केलेल्या रेश्मा भोसले यांच्याकडेही सात कोटी ३४ लाखांची देय रक्कम आहे. तर बावधन-कोथरूड डेपो या प्रभाग क्रमांक दहा मधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे दिलीप वेडे पाटील यांच्याकडील एकूण मालमत्ता ३७ कोटी ६७ लाख असून त्यांना तीन कोटी ८८ लाख रुपयांचे देणे आहे.

पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी या प्रभागातील काँग्रेसच्या उमेदवार संगीता गायकवाड यांच्यावर तीन कोटी ८५ लाखांचे कर्ज आहे. बीडकर यांच्यानंतर शिवसेनेचे समीर तुपे हे दुसऱ्या क्रमांकाचे कर्जदार असून त्यांच्यावर आठ कोटी २५ लाख रुपयांचे कर्ज असल्याचेही स्पष्ट झाले आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले आंबेगाव दत्तनगर-कात्रज गावठाण या प्रभागातील उमेदवार अभिजित कदम यांची देय रक्कम सहा कोटी ७१ लाख रुपयांची असून त्यांची एकूण मालमत्ता ही ३० कोटी पाच लाखांहून अधिक आहे.

सहा उमेदवारांकडे मालमत्ताच नाही

एका बाजूला कोटय़वधी, अब्जावधी रुपयांची मालमत्ता असलेले उमेदवार आणि त्यांची संपत्ती पुढे येत असताना दुसरीकडे नावावर एक रुपयाची मालमत्ता नसलेले सहा उमेदवारही निवडणूक लढवित आहेत. या सहा उमेदवारांमध्ये प्रत्येकी एक-एक उमेदवार भाजप आणि मनसेचे असून अन्य चार उमेदवार अपक्ष आहेत. एरंडवणा-हॅपी कॉलनी या प्रभाग क्रमांक १३ मधून भाजपकडून निवडणूक लढविणाऱ्या माधुरी सहस्रबुद्धे यांच्या नावावर शून्य मालमत्ता आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कर्वेनगर या प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या मेघा आटले यांचाही यामध्ये समावेश आहे. देविदास लोणकर, विलास गोघरे, विजय पवार, विष्णू गरूड यांच्याकडे काहीही संपत्ती नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.