मतदान यंत्रांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप

महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) घोटाळा झाल्याचा आरोप करीत यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय पराभूत उमेदवारांनी निषेध सभेत रविवारी घेतला. शहरातील सुमारे दोनशे पराभूत उमेदवार ही याचिका दाखल करणार आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी गेल्या २१ फेब्रुवारी (मंगळवारी) रोजी मतदान झाले. त्याचा निकाल गुरुवारी (२३ फेब्रुवारी) लागला. भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र त्यानंतर मतदान यंत्रांमध्ये घोटाळा करण्यात आल्याचा आरोप अन्य राजकीय पक्षांच्या पराभूत उमेदवारांकडून सुरु झाला होता. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी मतदानापूर्वी भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास सक्रिय राजकारणातून संन्यास घेऊ, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाच्या पाश्र्वभूमीवर भ्रष्ट मार्गाने सत्ता काबीज करण्यासाठी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळ करण्यात आल्याचा आरोप करीत बारामती हॉस्टेल येथे सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी निषेध सभेचे आयोजन केले होते. काँग्रेसचे दत्ता बहिरट, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके, बंडू उर्फ शंकर केमसे, नीलेश निकम, अर्चना कांबळे, सुनील गोगले, सचिन भगत, नीता मंजाळकर, रुपाली पाटील-ठोंबरे, राम बोरकर यांच्यासह अन्य उमेदवार या सभेला उपस्थित होते. जगातील बहुतांश ठिकाणी ईव्हीएम मशिनद्वारे निवडणुका घेण्याचे टाळण्यात येत असताना आपण त्याचा वापर का करायचा, असा प्रश्नही या वेळी उपस्थित करण्यात आला.

मतमोजणीपूर्वीच निकाल खासदारांना माहिती होता. यंत्रे कुठे सील करण्यात आली, याचे पुरावे आहेत. याचिका दाखल करताना ते न्यायालयाला सादर करण्यात येतील. निवडणूक आयोगानेही दबावाखाली काम केल्याचे स्पष्ट होत आहे, असे आरोप या वेळी करण्यात आले.

मतदान यंत्रात घोटाळा झाल्याच्या आरोपाच्या पाश्र्वभूमीवर येत्या मंगळवारी शहरात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथून सकाळी दहा वाजता या मोर्चाला प्रारंभ होणार असून सर्वपक्षीय कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत.