पिंपरीत सर्वाधिक मते मिळविणारा उमेदवारही भाजपचाच

राष्ट्रवादी काँग्रेसचा इच्छुक उमेदवार म्हणून काम सुरू केलेल्या आणि ऐनवेळी भाजपमध्ये दाखल झालेल्या चिंचवडगावातील सुरेश भोईर यांनी तब्बल ९ हजार ५१३ इतके विक्रमी मताधिक्य घेतले आहे. तर, गेल्या वेळी शिवसेनेकडून लढलेले आणि यंदा भाजपची उमेदवारी घेतलेल्या संदीप वाघेरे यांनी सर्वाधिक १५ हजार मते घेतली आहेत.

चिंचवडगावात ओबीसी गटातून भाजपची उमेदवारी मोरेश्वर शेडगे यांना निश्चित मानली जात होती. तोपर्यंत भोईर राष्ट्रवादीचे काम करत होते आणि राष्ट्रवादीकडून इच्छुकही होते. मात्र, राष्ट्रवादीचे तिकीट विद्यमान नगरसेवक संदीप चिंचवडे यांना मिळणार होते. त्यामुळे भोईरांना तिथे संधी मिळाली नाही. ऐनवेळी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करवून घेण्यात आला आणि उमेदवारीही देण्यात आली. भोईर यांना १५ हजार ९०५ मते मिळाली आणि चिंचवडे यांना ६ हजार ३९२ मतदान झाले. तब्बल ९ हजार ५१३ चे विक्रमी मताधिक्य भोईरांना मिळाले. सांगवीत उमेदवारी जाहीर झाली, तेव्हापासून माई ढोरे यांचा विजय निश्चित होता, प्रश्न फक्त मताधिक्याचा होता. अपेक्षेप्रमाणे त्यांना १४ हजार ८९८ इतकी भरभरून मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या ज्योती ढोरे यांना ५ हजार ५०१ इतके मतदान झाले.

माई ढोरे यांनी ९ हजार ३९७ मताधिक्य घेतले. िपपरी कॅम्पमध्ये राष्ट्रवादीचे डब्बू आसवानी यांना १५ हजार २३५ तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे धनराज आसवानी यांना ६ हजार १२ मते मिळाली. डब्बू यांना ९ हजार १३३ मताधिक्य मिळाले. दिघीत भाजपच्या यशोदा बोईनवाड यांना १२ हजार ६२८ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या आशा सुपे यांना ३ हजार ९८२ मते मिळाली. बोईनवाड यांना ८ हजार ६४६ मताधिक्य मिळाले. सांगवीत भाजपच्या अंबरनाथ कांबळे यांना ११ हजार ७० मते मिळाली; प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या बाळासाहेब सोनवणे यांना ३ हजार १४५ मते मिळाली. कांबळे यांना ७ हजार ९२५ मताधिक्य मिळाले. वाकडला भाजपच्या ममता गायकवाड यांना १३ हजार ३०९ मते मिळाली. प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या संजीवनी जगताप यांना ५ हजार ४५८ मते मिळाली. गायकवाड यांना ७ हजार ८५१ मताधिक्य मिळाले. िपपळे सौदागरला भाजपच्या शत्रुघ्न काटे यांना १४ हजार १३८ मते मिळाली; प्रतिस्पर्धी शिवसेनेचे कैलास कुंजीर यांना ६६६७ मते मिळाली. काटे यांना ७ हजार ४७१ इतके मताधिक्य मिळाले.

सर्वात कमी मताधिक्य राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर (५५ मते) यांना मिळाले आहे. त्याचप्रमाणे, शिवसेनेच्या मीनल यादव (५७ मते) आणि भाजपचे केशव घोळवे (१३० मते) कमी फरकाने निवडून आले आहेत. काळभोर आणि यादव या एकाच मोहननगर-काळभोरनगर प्रभागातील वेगवेगळ्या गटातील उमेदवार आहेत. तर, घोळवे शाहूनगर-संभाजीनगर प्रभागातील ओबीसी गटातील उमेदवार आहेत.