वेळेच्या नियोजनातील गोंधळामुळे पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर ओढावली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन याप्रकारावर दिलगिरी व्यक्त करत सभा रद्द केल्याचे जाहीर केले. आता ट्विटरवर भाजपची खिल्ली उडवली जात असून ‘ऐरवी मुख्यमंत्री जनतेला गाजर द्यायचे, पण आज जनतेनेच त्यांना गाजर दिला’ अशा शब्दात भाजपची खिल्ली उडवली जात आहे.

पुणे महापालिका निवडणुकीचा आखाडा तापला असून आज दुपारी दोन वाजता न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार होती. या सभेला मोठी गर्दी होईल, असा अंदाज होता. पण मुख्यमंत्र्यांची सभा असूनही सभेतील खुर्च्या रिकाम्याच होत्या. रिकाम्या खुर्च्या बघून मुख्यमंत्र्यांचा हिरमोड झाला आणि त्यांनी सभा रद्द केल्याची घोषणा ट्विटरद्वारे केले. यासाठी त्यांनी सभेच्या वेळेच्या नियोजनात गोंधळ झाल्याचे मान्य केले. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटवर लोकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. ‘आम्ही पुणेकर खुपच पारदर्शक आहोत. आम्ही होतो तेथे पण तुम्हाला दिसलो नाही’ असा चिमटा एका युजरने काढला आहे. वेळेच्या नियोजनातील गोंधळामुळे नव्हे तर भाजपला पुण्यातून प्रतिसाद मिळत नसल्याने ही सभा रद्द करण्याची नामूष्की भाजपवर आली असेही काही जणांनी म्हटले आहे. शेवटी पुणेकरांनी इंगा दाखवला, सदाशीव पेठसारख्या भागात भरदुपारी सभा घेतल्यावर जनता येणारच नाही असेही एका युजरने म्हटले आहे.