पुणे महापालिकेसाठी काल, मंगळवारी मतदान झाल्यानंतर इंडिया टुडे आणि अ‍ॅक्सिसने केलेल्या सर्व्हेनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची पिछेहाट होऊन भाजपला सत्ता मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर भाजपचे खासदार संजय काकडे यांनीही पुण्यात भाजपला एकहाती सत्ता मिळेल, असा दावा केला आहे. पुण्यात एकहाती सत्ता मिळाली नाही तर, सक्रिय राजकारणातून निवृत्त होईल, अशी घोषणाच त्यांनी केली आहे.

पुणे महापालिकेवर गेली दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. यावर्षीच्या महापालिका निवडणुकीत सत्तांतर होण्याची शक्यता ‘एक्झिट पोल’मधून व्यक्त करण्यात आली आहे. पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर पुणेकरांनी कुणाला कौल दिला? पुण्यात राष्ट्रवादीच्या घड्याळाची ‘टीकटीक’ सुरूच राहील की, भाजपचे ‘कमळ’ फुलेल, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे मतदानानंतर इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या सर्व्हेत भाजप पुणे महापालिकेत सत्तेवर येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येथील भाजपच्या नेत्यांनाही पुण्यात सत्ता मिळेल, असा ठाम विश्वास आहे. भाजपचे खासदार यांनी तर पुण्यात भाजपला एकहाती सत्ता मिळेल, असा दावा केला आहे. भाजपची एकहाती सत्ता आली नाही तर सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेईल, असा दावा ‘एबीपी माझा’शी बोलताना केला आहे.

अॅक्सिस आणि इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार, पुणे महापालिकेत राष्ट्रवादीला धक्का बसेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या १६२ जागांसाठी मतदान झाले आहे. पुण्यात भाजपला ७७ ते ८५ जागा मिळतील आणि हा पक्ष सर्वात मोठा ठरेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला ६० ते ६६ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवसेनेला १० ते १३ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. मागील निवडणुकीत मुसंडी मारलेल्या मनसेला तीन ते सहा जागा मिळतील, तर इतरांना केवळ १ ते ३ जागा मिळतील, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.