पर्वती विधानसभा मतदारसंघात सकाळी व दुपारी नागरिकांनी मतदान केंद्रांकडे फिरकण्यात निरुत्साहच दाखवला. नित्यनेमाने मतदानाचा हक्क बजावणारा जागरूक मतदार आणि पहिल्यांदाच मतदान करणारी उत्साही मंडळी वगळता सकाळी आणि दुपारी अगदी चार वाजेपर्यंत केंद्रांवर अजिबात गर्दी नव्हती. त्यानंतर मात्र मतदान संपण्यास तास-दीडतास उरलेला असताना काही केंद्रांवर मोठी गर्दी झालेली बघायला मिळाली.

यंदा प्रथमच एकपेक्षा अधिक व्होटिंग मशीन्सवर मतदान करायचे होते, त्याबद्दलही नागरिकांचे अनुभव वेगवेगळे होते. काही ठिकाणी विशेषत: ज्येष्ठ नागरिकांचा मतदान करताना गोंधळ उडत होता. मतदान यंत्रात उमेदवार गटांचे असलेले वेगवेगळे रंग मतदारांना पुन:पुन्हा समजावून सांगावे लागत होते, परिणामी मतदानास वेळ लागत होता. मतदारांना मिळणाऱ्या प्रत्येक स्लिपवर बूथ क्रमांक व खोली क्रमांक नसल्यामुळे मतदानाचे ठिकाण शोधताना अनेक जण गोंधळून जात होते. अपर इंदिरा नगर आणि बिबवेवाडीत हा गोंधळ दिसला. परंतु मतदार केंद्रांमधील अधिकारी व पोलिस नागरिकांना मदत करत होते.

काही ठिकाणी मतदार यादीत नावच नसल्यामुळे मतदारांना परत फिरावे लागले. बिबवेवाडीतील मतदार राहुल मोळेकरी म्हणाले,‘‘माझ्या आई व भावाचे नाव आधी शिवाजीनगर येथे होते. ते नव्याने बिबवेवाडीच्या पत्त्यावर नोंदवले जावे, यासाठी आम्ही फॉर्म भरून दिले होते. परंतु यादीत नावच न आल्यामुळे त्या दोघांनाही मतदान करता आले नाही. आम्हा कुटुंबीयांची आडनावेही प्रत्येकाच्या ओळखपत्रात वेगवेगळी छापून आली आहेत.’’ अरण्येश्वरमध्ये एका ठिकाणी गाडी पार्क करण्यावरून नागरिकांची पोलिसांशी बाचाबाची होत होती.

मतदारांना पक्ष कार्यकर्त्यांकडून घरपोच सेवा!

बिबवेवाडी परिसरात एका ठिकाणी मतदारांना चारचाकी गाडीतून मतदानास आणून पुन्हा घरी पोहोचवण्याची सेवाच काही पक्ष कार्यकर्त्यांनी चालवलेली दिसत होती. मतदान केंद्राच्या बाहेर हे कार्यकर्ते एकावेळी ४-५ मतदारांना गाडीतून घरी पोचवत होते. या मोटारीवरील पक्षाचे चिन्ह व उमेदवाराचे छायाचित्र झाकले होते.