निर्णय आज; ११८ नगरसेवकांचे राजकीय भवितव्य पणाला

महापालिका निवडणुकीच्या मैदानात विद्यमान ११८ नगरसेवकांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. त्यातील अनेक नगरसेवक एकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्यामुळे या लढतींकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेल्या नगरसेवकांमध्ये कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी सर्वपक्षीय मिळून ३४ नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली. तर ११८ विद्यमान नगरसेवक-नगरसेविका विविध पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्यातील अनेक प्रभागांतील लढती या चुरशीच्या होणार असल्याचे दिसून आले होते. तर काही प्रभागांतील लढती या निवडणुकीपूर्वीपासूनच चर्चेत राहिल्या होत्या. आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्यात प्रभागात सरळ लढती होणार असल्यामुळे राजकीय पक्षांची प्रतिष्ठाही तेथे पणाला लागली आहे.

pmc1

चर्चेतील लढती

डेक्कन जिमखाना

या प्रभागात विद्यमान उपमहापौर, काँग्रेसचे मुकारी अलगुडे व स्थायी समिती नगरसेवक बाळासाहेब बोडके यांच्यासह मनसेतून सेनेत दाखल झालेले नगरसेवक राजू पवार यांच्यात तिरंगी सामना आहे. भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ हेही या तिघांच्या गटातूनच निवडणूक लढवत आहेत.

कसबा पेठ-सोमवार पेठ

कसबा पेठ-सोमवार पेठ या प्रभागात भारतीय जनता पक्षाचे गटनेता गणेश बीडकर आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे.

पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी

या प्रभागील लढत चर्चेत आली ती राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नगरसेविका रेश्मा भोसले यांच्या उमेदवारीमुळे. भोसले यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यानंतर त्यांचे पती आमदार अनिल भोसले यांनी भाजपकडून उमेदवारी खेचून आणली. मात्र न्यायालयात आव्हान देण्यात आले. भोसले भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत.