केंद्रीय मनुष्यबळमंत्री प्रकाश जावडेकर यांची टीका

स्वत:चे घर जरी बांधायचे असेल आणि महापालिकेची परवानगी घ्यायची असेल तर हात ओले केल्याशिवाय कामच होत नाही, असा आरोप केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी केला. केंद्र आणि राज्यातील योजना चांगल्याप्रकारे स्थानिक पातळीवर राबविण्यासाठी पुण्यात परिवर्तन करावे लागेल. केंद्रात परिवर्तन करून सुरू झालेली क्रांती पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आल्याशिवाय सुफळ संपूर्ण होणार नाही, असेही जावडेकर यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीत प्रचारासाठी आलेल्या जावडेकर यांची कोथरूड येथील डहाणूकर कॉलनी येथे सभा झाली. पक्षाचे पदाधिकारी आणि उमेदवार या वेळी उपस्थित होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने अदलाबदलीने टक्केवारी करीत सत्ता राबविली.

इंच-इंच जमीन ताब्यात घेऊन पुण्याची वाट लावली असे सांगून जावडेकर म्हणाले, केंद्रात सत्तेवर आल्यानंतर अनेक लोक मोदी सरकार चांगले काम करत असल्याचे सांगतात. परंतु केंद्र आणि राज्यातील चांगल्या योजना राबविण्यासाठी पालिकेत बहुमत नसेल तर पन्नास टक्के कामे होत नाहीत. त्यामुळे परिवर्तन आवश्यक आहे.

गेल्या पन्नास वर्षांपासून मुळा-मुठा

सुधारण्याचा कार्यक्रम ठप्प

मी पुण्याचा असून कळत्या वयापासून वृत्तपत्रांतून मुळा-मुठा नदी सुधारणेच्या बातम्या वाचल्या. आज पन्नास वर्षांनंतरही नदी सुधारणेच्याच बातम्या वाचाव्या लागतात. केंद्रात दहा वर्षे आणि राज्यात सलग पंधरा वर्षे सत्तेत असताना काँग्रेस, राष्ट्रवादीने नदी सुधारणेसाठी काही केले नाही. केंद्रात परिवर्तन झाल्यानंतर चौदाव्या वित्त आयोगामुळे अशा प्रकारच्या प्रकल्पांसाठीचे पैसे राज्य सरकारने फेडले पाहिजेत, असा नियम झाला. मात्र, मी भांडून हा प्रकल्प चौदाव्या वित्त आयोगाच्या आधीचा आहे असे सांगितले आणि नरेंद्र मोदी, अरुण जेटली यांनी माझी सूचना मान्य करत जुन्या नियमांप्रमाणे एक हजार कोटींचा निधी नदी सुधारणेसाठी दिला, असेही जावडेकर यांनी सांगितले.