पालिका निवडणुकीतही प्रमाण वाढणार असल्याने उमेदवारांमध्ये उत्सुकता

यंदाच्या महापालिका निवडणुकीत एखाद्या उमेदवाराचा प्रचार व्हावा, त्याप्रमाणे ‘नोटा’ म्हणजेच ‘असलेल्या उमेदवारांमधील एकही पसंत नाही,’ या पर्यायाचा वापर करण्याचा प्रचार समाज माध्यमांमधून सुरू होता. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’ वापरणाऱ्या मतदारांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. त्या पाश्र्वभूमीवर यंदाही ‘नोटा’चे प्रमाण वाढणार का, याबाबत अगदी उमेदवारांमध्येही उत्सुकता आहे.

प्रभागात उभा असलेला एकही उमेदवार मत देण्यास योग्य वाटत नसल्यास ‘नोटा’ हा पर्याय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुळात ‘सगळे सारखेच’ असे म्हणून मतदानच टाळणाऱ्या नागरिकांमध्ये ‘नोटा’ वापरा पण मतदान करा अशी जागृती करण्याचा प्रयत्न सामाजिक संस्था, संघटनांकडून करण्यात येत होता. गेल्या दोन निवडणुकांनुसार एकूण मतदानाच्या तुलनेत हा पर्याय वापरणाऱ्या मतदारांचे प्रमाण अगदी नगण्य असले तरीही ते वाढताना दिसते आहे.

लोकसभेच्या निवडणुकीला पुण्यातून १८ लाख ३५ हजार ८३५ नागरिकांनी मतदान केले होते. त्यातील सहा हजार ४३८ नागरिकांनी ‘नोटा’ हा पर्याय निवडला होता. झालेल्या मतदानाच्या तुलनेत हे प्रमाण ०.६५ टक्के होते. विधानसभेच्या निवडणुकीत मात्र हे प्रमाण काही अंशी वाढलेले दिसते. वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, कॅन्टोन्मेंट आणि कसबा अशा आठ मतदारसंघांमध्ये पुणे विभागले आहे. आठ मतदारसंघांमध्ये मिळून १५ लाख १७ हजार ७१८ नागरिकांची मते वैध ठरली. त्यातील १३ हजार ८६० नागरिकांनी ‘नोटा’ हा पर्याय निवडला होता. एकूण झालेल्या मतदानाच्या तुलनेत हे प्रमाण ०.९१ टक्के होते.

निवडणुकांसाठी समाजमाध्यमांवर तर एखाद्या उमेदवाराचा हिरिरीने प्रचार व्हावा त्याप्रमाणे ‘नोटा’ चा प्रचार करण्यात येत होता. अगदी मतदानाच्या दिवशीही नोटा वापरण्याबाबत आवाहन करणाऱ्या ध्वनिफिती, संदेश समाजमाध्यमांवर फिरत होते. लोकसभेसाठीच्या पुणे मतदारसंघाची हद्द आणि विधानसभेचे आठ मतदारसंघ व त्याअंतर्गत येणारे पालिकेचे प्रभाग यांच्या हद्दीत फरक आहे. त्यामुळे एकूण मतदारांच्या संख्येत फरक दिसत असला तरी ‘नोटा’ या पर्यायासाठी वाढता कल गेल्या निवडणुकींच्या निकालांवरून दिसून येतो. हाच कल पालिका निवडणुकीतही कायम राहणार का, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांच्या तुलनेत दोन उमेदवारांच्या मतांमधील फरक कमी असल्यामुळे ‘नोटा’ हा पर्याय निकालावर परिणाम करेल, असा अंदाज आहे.