महापालिकेत ९८ नगरसेवक निवडून आणण्याचे श्रेय

महापालिका निवडणुकीत पुण्यात भारतीय जनता पक्षाला जे अभूतपूर्व यश मिळाले त्या यशात अनेकांचा वाटा असला पक्षाची कामगिरी सरस व्हावी यासाठी जी मंडळी प्रयत्नशील होती, त्यातील एक आघाडीचे नाव म्हणजे पक्षाचे ‘हेडमास्तर.’ पक्षातील सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक त्यांना ‘दादा’ म्हणतात; पण ते त्यांचे हाक मारण्याचे नाव. त्यांची खरी ओळख ‘हेडमास्तर’ अशीच. या हेडमास्तरांनीच पक्षाची संपूर्ण संघटना खऱ्या अर्थाने या निवडणुकीत सक्रिय केली आणि आणि सवंग प्रसिद्धीपासून चार हात दूर राहत त्यांनी ऐन निवडणुकीच्या धामधुमीतही पक्ष योग्य मार्गावर राहील यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश आले आणि ‘हेडमास्तरां’च्या कार्यकाळात भाजपचे तब्बल ९८ नगरसेवक महापालिकेत निवडून गेले.

शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यापासूनच योगेश गोगावले यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर भर दिला होता. शहराचा विकास हा मुद्दा घेऊन नागरिकांपर्यंत गेलो, तर भाजपची सत्ता महापालिकेतही येऊ शकते, हा पक्का विश्वास दादांना होता. त्यामुळेच तेच मुख्य सूत्र ठेवून त्यांनी गेले काही महिने निवडणुकीची तयारी चालवली होती आणि प्रत्येक पातळीवर तयारी सुरू असताना ‘मला भोंगळपणा चालणार नाही, मला रिझल्ट पाहिजे,’ असे कार्यकर्त्यांना ठणकावून सांगत ‘हेडमास्तर’ गोगावले यांनी अनेकांना वठणीवर आणले. स्व. रामभाऊ म्हाळगी, वसंतराव भागवत, जगन्नाथराव जोशी, शिवाजीराव आढाव यांना आदर्श मानणाऱ्या गोगावले यांनी पक्षसंघटना मजबूत, तरच पक्ष मजबूत हेच सूत्र निवडणुकीसाठी प्रथमपासून ठेवले होते. याच सूत्रावर त्यांनी काम केले आणि निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या हजारी यादीप्रमुखांचा मेळावा शहरात यशस्वी करून दाखवला. या मेळाव्यात हजारी यादीप्रमुख फार मोठय़ा संख्येने उपस्थित होते आणि त्यामुळे पक्षाची संपूर्ण यंत्रणा सक्रिय व्हायला मोठीच मदत झाली. कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षणाची नितांत गरज असते हेही ‘हेडमास्तरां’नी ओळखले आहे आणि त्या दृष्टीनेही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी दोन दिवसांचे शिबिर भरवण्यापासून ते अन्य उपक्रमांपर्यंत अनेक गोष्टी त्यांनी पार पाडल्या. राजकारणात पदांवरील व्यक्ती अन्य कोणाला दुखवायला सहसा कधी धजावत नाहीत. गोगावले यांचे मात्र तसे नाही. पक्षाचा पदाधिकारी असो वा कार्यकर्ता जो चुकीचे काम करत असले त्याला योग्य ती समज देण्यात ते मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळेच या दादांचा धाक सगळ्यांनाच आहे. गेली चाळीस वर्षे राजकारणात असलेल्या दादांचा अनुभव अशा वेळी उपयोगाला येतो.

महापालिका निवडणुकीचा पक्षाचा शहरासाठी तयार करण्यात आलेला जाहीरनामा आणि प्रभागनिहाय जाहीरनामे हेही दादांच्याच पुढाकाराने तयार झाले. हा जाहीरनामा म्हणजे आमच्या पुढील पाच वर्षांचा संकल्प आहे आणि त्याच्या आधारेच आमच्या निवडून आलेल्या प्रत्येक नगरसेवकाला पुढे जायचे आहे. हे आम्ही घडवून दाखवणार म्हणजे दाखवणार असेच दादा सध्या सातत्याने सांगत आहेत.