पृथ्वीराज चव्हाण यांचे टीकास्त्र

नोटाबंदी हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळातील सर्वात मोठा घोटाळा आहे. नोटाबंदी करून किती काळा पैसा बाहेर आला, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्पष्टीकरण देत नाहीत. त्यामुळे त्यातून काय साध्य झाले, असा प्रश्न उपस्थित करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नोटाबंदीची संसदीय चौकशी करावी, अशी मागणीही केली.

महापालिका निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पृथ्वीराज चव्हाण यांची येरवडा येथे जाहीर सभा झाली. या सभेत ते बोलत होते. शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, गोपाळ तिवारी, रोहित टिळक यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले की, पुणे मेट्रोसाठी मी सन २०१४ मध्येच केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडून मान्यता घेतली होती. पुणे आणि नागपूर मेट्रोचा प्रस्ताव हा एकाच दिवशी केंद्रीय स्तरावर मान्य झाला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर नागपूर मेट्रोला मान्यता मिळविली. पुण्याच्या मेट्रोला मात्र जाणीवपूर्वक पावणेतीन वर्षे उशीर करण्यात आला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मेट्रो प्रकल्पाला मान्यता देत श्रेय घेण्याचा प्रयत्नही भाजपकडून करण्यात आला. मेट्रोला पावणेतीन वर्षे उशीर का झाला याचे उत्तर पालकमंत्री गिरीश बापट आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी द्यावे. मुख्यमंत्री जाणूनबुजून पश्मिच महाराष्ट्रबाबत आकसाचे राजकारण करीत आहेत. विदर्भाचा विकास करताना पश्चिम महाराष्ट्राला मागे ठेवून काय साधणार आहे.

‘नोटाबंदीमुळे मोठय़ा प्रमाणात लोकांचा रोजगार गेला आहे. नोटाबंदी करून काळा पैसा नष्ट करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. मात्र काळा पैसा नष्ट झाला नाही. केवळ घोषणाबाजी करणाऱ्या सरकाराला निवडणुकीच्या निमित्ताने जाब विचारण्याची वेळ आली आहे, असेही चव्हाण म्हणाले.