महिलेचा मृत्यू;  १९०० घरांमध्ये डासांची पैदास

गेल्या दहा दिवसांत पालिकेने डासांच्या पैदाशीबद्दल दंड करण्याचा धडाका लावला आहे. ‘इनडोअर व्हेक्टर प्रोग्रॅम’ अंतर्गत घरोघरी भेट देऊन साठलेल्या पाण्यात होणाऱ्या डासांच्या पैदाशीचा शोध घेण्याचा उपक्रम कीटक प्रतिबंधक विभागाने हाती घेतला आहे. त्यात २५ सोसायटय़ांसह चार बांधकामांच्या ठिकाणी दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान, गुरूवारी पालिकेच्या एका महिला कर्मचाऱ्याचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला असून या महिलेची डेंग्यूची ‘आयजीजी’ चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली आहे. मात्र अद्याप अधिकृतरीत्या हा डेंग्यूचा मृत्यू म्हणून जाहीर करण्यात आलेला नाही.

‘इनडोअर व्हेक्टर प्रोग्रॅम’मध्ये आतापर्यंत १ लाख ९४ हजार घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती कीटक प्रतिबंधक विभागाने दिली. यातील १,९४७ घरांमध्ये डासांची पैदास झाल्याचे आढळून आले. यात १६ ऑगस्टपासून पुढच्या दहाच दिवसांत शहरात ९२ हजार रुपयांचा दंड नागरिकांना भरावा लागला आहे. शहरात ऑगस्टमध्ये आतापर्यंत ४१२ डेंग्यूसदृश रुग्ण सापडले असून त्यातील ७४ जणांना डेंग्यू झाल्याचे अधिकृत चाचणीत निष्पन्न झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या ३३ वर्षांच्या एका महिला कर्मचाऱ्याचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. १४ ऑगस्टला या महिलेस ताप आल्यामुळे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून उपचार घेऊन त्या घरी गेल्या व पुन्हा २२ तारखेला त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले होते. २५ तारखेला सकाळी त्यांचा मृत्यू झाला. पहिल्यांदा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डेंग्यूची ‘एनएस १’ ही चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्याने रुग्णालयाकडून या महिलेची नोंद पालिकेकडे झाली होती. दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल केल्यानंतर पालिकेच्या नायडू रुग्णालयात त्यांची पुन्हा रक्तचाचणी करण्यात आली होती. या वेळी ‘आयजीएम’ ही चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली.

कीटक प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना बळिवंत म्हणाल्या,‘‘२० ऑगस्टला आम्ही या रुग्णाच्या घराभोवती डासांची पैदास शोधण्यासाठी सर्वेक्षण केले असता घराजवळ तीन ठिकाणी डासांची वाढ झालेली सापडली व परिसरात औषध व धूर फवारणी करण्यात आली होती. अद्याप हा मृत्यू डेंग्यूचा मृत्यू म्हणून जाहीर करण्यात आला नसून अशा प्रत्येक मृत्यूचे प्रकरण पालिकेच्या ‘डेथ ऑडिट कमिटी’द्वारे तपासले जाते.’

‘इनडोअर व्हेक्टर प्रोग्रॅम’ हा ऑक्टोबपर्यंत राबवण्यात येणार असून पाणी साठून डासांची पैदास होऊ देणाऱ्यांना दंड करण्याचे सत्रही सुरू राहील. वारंवार नोटिसा देऊनही डासांच्या पैदाशीबद्दल न ऐकल्यास संबंधितांवर पालिकेतर्फे खटला भरला जाईल.’’

– डॉ. कल्पना बळिवंत, प्रमुख, कीटक प्रतिबंधक विभाग