महापालिकेची मंत्रालयात असलेली अनेक कामे विविध खात्यांशी संपर्क करून पूर्ण करून घ्यावी लागतात. तसेच शासनाकडून विविध खात्यांच्या अनुदानापोटी महापालिकेला कोटय़वधी रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी महापालिका आता मंत्रालय अधिकारी नेमणार आहे. हा अधिकारी उपायुक्त दर्जाचा असेल आणि त्याच्याकडे फक्त मंत्रालयातील कामे एवढाच कार्यभार राहील.
स्थानिक संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) रद्द झाल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट येत आहे. त्यामुळे विकासकामे कशी करायची, असा प्रश्न महापालिका प्रशासनापुढे आहे. अशा परिस्थितीत महापालिका प्रशासनाने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधावेत आणि थकबाकी वसुलीवर भर द्यावा असे दोन उपाय प्रामुख्याने सुचवले जात आहेत. महापालिकेला राज्य शासनाकडून शेकडो कोटी रुपये येणे असून त्याच्या वसुलीसाठी प्रभावी प्रयत्न होत नाहीत ही देखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शासनाकडून अनुदानापोटी जी रक्कम येणे बाकी आहे त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे, अशीही मागणी सातत्याने होत होती.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत विविध प्रश्नांचा विचार करण्यासाठी महापालिकेत शुक्रवारी एक बैठक बोलावण्यात आली होती. पालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. महापालिकेचे राज्य शासनाकडे जे प्रश्न प्रलंबित आहेत, त्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. महापालिकेच्या विविध खात्यांचे अनेक प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे गेले असले तरी गेली काही वर्षे ते तेथे प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे त्या त्या खात्यांना विकासकामांची पुढील प्रक्रिया करता आलेली नाही. या संबंधी यापूर्वीही बैठका झाल्या होत्या. मात्र ठोस उपाययोजना झालेली नाही. या प्रलंबित प्रश्नांबाबत बापट यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. तसेच महापालिकेला अनुदानापोटी जी येणे बाकी आहे त्याबाबतही चर्चा झाली. राज्य शासनाकडे महापालिकेचे जे विषय प्रलंबित आहेत तसेच जी थकबाकी आहे त्याच्या पाठपुराव्यासाठी महापालिकेने स्वतंत्र अधिकारी नेमावा आणि या अधिकाऱ्याकडे फक्त मंत्रालयाशी संबंधित विषयच द्यावेत, असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.
महापालिकेत यापूर्वीही अशा प्रकारची चर्चा होऊन असा विषय आला होता. मात्र अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष नेमणूक मात्र होऊ शकली नाही. पालकमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनुसार आता महापालिकेकडून मंत्रालय अधिकारी नेमण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.