शहरात आमदार, खासदार आणि नगरसेवकांच्या निधीतून उभारण्यात येत असलेले बसथांबे हे प्रवाशांच्या सोयीचेच असल्याचा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे. रस्त्यावर थांबे उभारल्यास वाहतुकीस अडथळा होईल म्हणून हे थांबे महापालिकेच्या संपर्कात राहून पदपथांवर उभारण्यात येत आहेत, असाही दावा पीएमपीतर्फे करण्यात आला आहे.
‘बिनकामाचे बसथांबे तीस कोटींचे’ हे वृत्त दै. ‘लोकसत्ता’च्या अंकात प्रसिद्ध झाले असून प्रवाशांसाठी अतियश गैरसोयीचे ठरत असलेले आणि पूर्णत: सदोष रचनेचे बसथांबे पीएमपीतर्फे उभारले जात असल्याची तक्रार शहरात सातत्याने केली जात आहे. मात्र, पीएमपीच्या दृष्टीने हेच थांबे सोयीचे आहेत. ‘सध्या उभारले जात असलेले बसथांबे हे मुंबईतील थांब्यांप्रमाणे उभारले जात आहेत. त्यांची छताची रुंदी तीन फूट इतकी होती. मात्र, महापौरांनी केलेल्या सूचनेनुसार छताचा भाग एक फुटाने वाढवण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. हे थांबे प्रवाशांच्या सोईसाठीच उभारण्यात येत आहेत,’ असा दावा पीएमपीने बुधवारी  प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे. या थांब्यांवर प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी जागा व पुरेसा रुंद बाक उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. या व अशा इतरही त्रुटींकडे महापौर चंचला कोद्रे यांनी पीएमपीचे लक्ष वेधले होते. मात्र, छताची रुंदी एक फूट वाढवल्यानंतरही थांब्यांची रचना सदोषच असल्याच्या तक्रारी आहेत.
बसथांबे रस्त्यात उभारल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकेल. त्यामुळे हे थांबे नागरिकांना अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन महापालिकेच्या संपर्कात राहून पदपथांवर उभारले जात आहेत, असाही दावा या पत्रकातून करण्यात आला आहे.