माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाच सप्टेंबरला पिंपरीतील सांगवी ते किवळे दरम्यानच्या पहिल्या बीआरटी मार्गाला सुरूवात झाली, त्यास मंगळवारी महिना पूर्ण झाला. या कालावधीत प्रवासी संख्या १३ हजाराने वाढली तसेच १२ लाखाचे उत्पन्नही वाढल्याचा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे. नाशिक फाटा ते वाकड या मार्गावरील बीआरटी मार्ग याच महिन्यात सुरू करण्याचा मानस आयुक्त राजीव जाधव यांनी व्यक्त केला.
बीआरटी मार्गाला एक महिन्याचा कालावधी झाल्याच्या निमित्ताने झालेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त म्हणाले, बीआरटी सुरू होण्यापूर्वी दररोज ६७ लाख ८४४ प्रवासी प्रवास करत होते, आता ती संख्या ८१ हजार ६२१ इतकी झाली आहे. या मार्गावरील बससेवेमुळे १३ हजाराने प्रवासी संख्या वाढल्याचे दिसून येते. या मार्गाविषयी नागरिकांनी वेगवेगळ्या माध्यमातून अभिप्राय दिले असून तातडीने अन्य मार्ग सुरू करण्याची मागणी केली आहे. पालिकेचे सहशहर अभियंता राजन पाटील, श्रीकांत सवणे, ज्ञानदेव जुंधारे, विजय भोजने, अण्णा बोदडे, पीएमपीचे त्रिंबक धारूरकर, मयूरा िशदेकर आदी यावेळी उपस्थित होते.