योजना कागदावरच; मार्चपर्यंत अंमलबजावणीची शक्यता

नोटाबंदीच्या पाश्र्वभूमीवर पीएमपीला रोकडरहित व्यवहाराचे वावडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोकडरहित व्यवहारांसाठी उपयुक्त ठरणारी पीएमपीची ‘मोबिलिटी कार्ड’ योजना कागदावरच आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना ‘मोबिलिटी कार्ड’साठी अजून चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात अनेक प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले होते. यात पीएमपी प्रवाशांसाठी ‘मोबिलिटी कार्ड’ योजनेचा समावेश होता. या सर्व प्रकल्पांचे गेल्या जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पीएमपीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना हे कार्ड देण्याचे नियोजन त्या वेळी करण्यात आले. प्रत्यक्षात पाच महिने होऊनही योजनेच्या अंमलबाजवणीसाठी विशेष प्रयत्न झाले नसून योजना कार्यान्वित झाली असती तर निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर उत्पन्नवाढीच्या दृष्टीने पीएमपीलाच नफा झाला असता.

मोबाइल रिचार्जप्रमाणेच ही योजना आहे. नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या एक हजार ५५० बसगाडय़ांमध्येही हे कार्ड रिडर बसविण्यात येणार आहे. सध्या असलेल्या गाडय़ांमध्येही ही सुविधा देण्यात येणार आहे. गाडय़ांमधील ‘कार्ड रिडर’वर मोबिलिटी कार्ड पंच करावे लागणार असून प्रवासी आणि वाहकांच्या दृष्टीने ही योजना उपयुक्त ठरणार आहे. सुटय़ा पैशांचे वाद टाळण्यासही त्यामुळे मदत होणार असून गाडी बदलल्यानंतरही एकदा कार्ड पंच केल्यानंतर त्या मार्गावरील प्रवाशांना सहजपणे पुढेही प्रवास करता येणार आहे.

नोटाबंदींचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी स्वत:कडील पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून बँकेत भरणा केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. ही योजना कार्यान्वित झाली असती तर या घटनाही टाळणे शक्य झाले असते. गाजावाजा करून या योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते. पुढच्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत ही योजना सुरू होईल, असा दावा पीएमपी आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.

कार्ड कुठे?

योजना सुरू झाल्यानंतर मोबिलिटी कार्ड साठ रुपयांना पीएमपीच्या सर्व आगारांत उपलब्ध असेल. एसटी, रेल्वे स्थानके येथेही ते विक्रीसाठी ठेवण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली; मात्र ही योजना सुरु व्हायला आणखी चार महिने बाकी आहेत.