पुणे जिल्हयातील दोन महापालिका आणि तीन कॅन्टोन्मेंट क्षेत्र वगळून पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यामध्ये ७ तालुके आणि ८५७ गावांचा समावेश असून ७ हजार ३५६ चौ.किमी. क्षेत्र असलेला हा आराखडा एका वर्षात पूर्ण करणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते हे देखील उपस्थित होते.

यावेळी बापट म्हणाले की, राज्य सरकारकडून आदेश मिळाल्यानंतर त्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत नागरिकांना आराखड्या संदर्भातील हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत. तसेच एका वर्षामध्ये विकास आराखडा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. देशात २१ प्राधिकरण क्षेत्रे असून त्यामध्ये दिल्लीचे सर्वाधिक क्षेत्रफळ होते. मात्र आता पुण्याचे क्षेत्रफळ सर्वाधिक असणार आहे. पीएमआरडीएचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा प्राधिकरण कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आणि वेळेत नागरिकांना निरीक्षणासाठी ठेवण्यात आला असून येत्या ३१ जुलैपर्यंत हा नकाशा तयार करण्याचे काम पूर्ण होईल. हवाई छायाचित्रण करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून १० सें.मी. पर्यंतची स्पष्टता आणि अचूकता असलेला नकाशा तयार आहे. एक्‍सिस्टींग लॅण्ड यूज – ईएलयु सीमांवर नागरिकांकडून येत्या दोन महिन्यांमध्ये लेखी हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत, असे ही ते यावेळी म्हणाले.