राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असल्यामुळे पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांना लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा या वेळी कमी मनुष्यबळ उपलब्ध होणार  आहे. त्यामुळे मतदानाच्या बंदोबस्ताचे नियोजन करताना पोलिसांची कसोटी लागणार आहे. त्यामध्ये पुणे ग्रामीण पोलिसांना बंदोबस्ताची आखणी करताना फारच अडचण येण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्य़ात सात हजार ४७१ मतदान केंद्रे आहेत. त्यामधील सव्वा तीन हजार मतदान केंद्रे ही पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुणे शहर पोलिसांना दोन हजार होमगार्ड, इतर जिल्ह्य़ातील पाचशे पोलीस कर्मचारी मतदान बंदोबस्तासाठी मिळाले होते. अशीच परिस्थिती पुणे ग्रामीण पोलिसांकडे होती. पुणे ग्रामीण पोलिसांना होमगार्ड आणि बाहेरून पोलीस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, आता राज्यात एकाच वेळी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे बाहेरून बंदोबस्त मिळणे अवघड होणार आहे.
पुणे पोलिसांकडे साधारण आठ हजार पोलीस मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यातील पाचशे कर्मचारी हे पुणे ग्रामीण पोलिसांना बंदोबस्तासाठी दिले जाणार आहेत. त्याबरोबरच लोकसभेपेक्षा कमी होमगार्ड मिळण्याची शक्यता आहे. मतदानासाठीच्या बंदोबस्ताचे नियोजन करताना पोलीस अधिकाऱ्यांचा कस लागत आहे. पुणे शहरात एकाच ठिकाणी २० पेक्षा जास्त असणारी काही मतदान केंद्रं आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवणे अपेक्षित आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्याकडील महत्त्वाच्या कामावरील सोडून सर्व कर्मचारी बंदोबस्तावर नियुक्त केले जाणार आहेत. त्याबरोबरच अधिकाऱ्यांचे सुरक्षारक्षक म्हणून असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त केला जाणार आहे. बॉम्ब शोधक पथक, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण विरोधी पथक यांची पथके बंदोबस्तासाठी लोकसभेप्रमाणे राहणार आहेत. याबाबत विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी सांगितले की, लोकसभेपेक्षा यावेळी पोलीस मनुष्यबळ कमी आहे. असलेल्या मनुष्यबळात योग्य नियोजन करण्याचे काम सुरू आहे.
पुणे ग्रामीणमध्ये साधारण तीन हजार २३६ मतदान केंदं्र आहेत. सध्या पुणे ग्रामीणकडे अडीच हजार पोलीस मनुष्यबळ आहे. पुणे जिल्ह्य़ात अनेक महत्वाचे मतदारसंघ आहेत. शहर पोलिसांपेक्षा निम्मेच पोलीस मनुष्यबळ पुणे ग्रामीण पोलिसांकडे आहे. त्यामुळे पुणे ग्रामीणकडून अतिरिक्त बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील बंदोबस्ताचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती पुणे ग्रामीणच्या एका अधिकाऱ्याने दिली.