पुण्यासह देशभरातील ३५० जणांची फसवणूक

कर्ज देण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील तिघा भामटय़ांना सायबर गुन्हे शाखेने पकडले. प्राथमिक तपासात भामटय़ांच्या टोळीने महाराष्ट्रातील २४ जणांसह देशभरातील ३५० जणांना ८ कोटी ७८ लाखांना गंडविल्याचे निष्पन्न झाले आहे.

अमरचंद मनोहरलाल केसरी (वय २५), दीपाली ऊर्फ  गोल्डी ओमप्रकाश पांडे (वय २१), नवज्योत करुणाकरण मेनन (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

किरण लक्ष्मण जांभळे (रा. अप्पर इंदिरनगर, बिबवेवाडी) याला कर्ज देण्याच्या आमिषाने तीन लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.

या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर गुन्हे शाखेकडून या गुन्ह्य़ाचा समांतर तपास करण्यात येत होता. दिल्लीतील एका कॉलसेंटरमधून जांभळे याच्या मोबाईलवर संपर्क साधण्यात आला होता. त्याआधारे सायबर गुन्हे शाखेने दिल्लीत सापळा रचून तिघा आरोपींना पकडले, अशी माहिती सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.