पिंपरी चिंचवडमधील सांगवी भागात मौजमजा करण्यासाठी मोबाईल चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या मुलासह पोलिसांनी तरुणांनादेखील ताब्यात घेतले आहे. संबंधितांनी सुमारे दोन लाख रुपयांचे २५ मोबाईल चोरल्याची कबुली सांगवी पोलिसांना दिली आहे.

सांगवी पोलिसांना पिंपळे गुरव येथील घाटावर दोन इसम चोरीचे मोबाईल विकत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नन्नावरे यांच्या टीमने त्या ठिकाणी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे ११ मोबाईल सापडले. याबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे अधिक तपासासाठी दोघांना पोलीस ठाण्यात घेऊन नेण्यात आले. त्यानंतर दोघांकडे चौकशी केल्यावर आणखी १४ मोबाईल पिंपळे गुरवमधील पवना नदीच्या काठी एका बॅगेत दगडाच्या शेजारी लपवून ठेवल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी हे सर्व मोबाईल हस्तगत केले.

या प्रकरणात पोलिसांनी रमेश उर्फ तिम्या महादेव देवकेरे (वय वर्षे-१९) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. तर अल्पवयीन मुलाला समज देऊन सोडण्यात आले आहे. रमेश काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटलेला असून दोन्ही मुले शेजारी राहतात. मैत्री झाल्यावर पुढे दोघे मौज-मजेसाठी मोबाईल चोरी करु लागले. ज्या घरात कोणी नसेल किंवा घर उघडे असले, अशा ठिकाणी लक्ष ठेऊन दोघे चोरी करायचे.