जेथे वाङ्मयीन चर्चा आणि परिसंवाद व्हावेत ही साहित्यप्रेमींची अपेक्षा असते, त्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून चक्क पोलिसांची हजेरी घेण्याचा अजब कार्यक्रम रसिकांनी रविवारी पाहिला. आशा भोसले संगीत संगीत रजनीसाठी झालेली मोठी गर्दी आटोक्यात आणण्यापूर्वी पोलिसांनी मंगेश पाडगावकर सभागृहाच्या व्यासपीठाचा ताबा घेत तेथूनच हजेरी घेतल्याचे दृश्य संगीतप्रेमींनी याची देही याची डोळा पाहिले.
पिंपरी येथील हिदुस्थान अॅन्टिबायोटिक्सच्या मदानावर सुरू असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले यांचा संगीत रजनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या संमेलनाचे हे खास आकर्षण असल्यामुळे साहित्य आणि संगीतप्रेमी रसिकांनी तुडुंब गर्दी केली होती. मंडपामध्ये योग्य ठिकाणची जागा पटकाविण्यासाठी काहींनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मुलाखतीनंतरही मंगेश पाडगावकर सभागृह सोडले नाही. त्यामुळे संगीत रजनीसाठी ज्या महत्त्वाच्या व्यक्तींना प्रवेशिका देण्यात आल्या होत्या त्यांच्या राखीव जागा आधीच दुसऱ्यांनी पटकावल्याचे निदर्शनास आले.
या कार्यक्रमासाठी झालेली तोबा गर्दी पाहता संयोजकांनी नियुक्त केलेल्या खासगी सुरक्षारक्षकांना नागरिक दाद देईनासे झाले. हे पाहून आधीचा कार्यक्रम संपल्यानंतर पोलिसांनी व्यासपीठाचा ताबा घेतला. एका पोलीस निरीक्षकाने ध्वनिक्षेपकाचा ताबा घेतला आणि चक्क व्यासपीठावरूनच पोलीस कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यास सुरुवात केली. नेमून दिलेल्या ठिकाणी पोलीस कर्मचारी नसतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला. ही हजेरी पाहून आपण शाळेत तर नाही ना आलो असा प्रश्न रसिकांना पडला. पत्रकारांच्या जागेवर बसलेल्या नागरिकांना उठविण्यासाठी पोलीस सरसावले. त्यांनी काही रसिकांना जागा खाली करून देण्यास भाग पडले. आशा भोसले संगीत रजनीला प्रचंड गर्दी झाल्यामुळे मुख्य सभागृहाला असलेले बॅरिकेट्स काढण्यात आले. त्याचबरोबरीने भारतीय बठकीची व्यवस्था करून रसिकांना जागा करून देण्यात आली. सभागृहाचे पडदे काढून मंडप खुला करण्यात आला. वाद्यांची जुळवाजुळव करून झाल्यानंतर पावणेआठ वाजता संगीत रजनीला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत गर्दीचा ओघ सुरूच होता.