पुणे शहर वेगाने वाढत असून या ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृतीची माणसे आहेत. या ठिकाणच्या जीवनशैलीमध्ये बदल होत आहेत. त्यामुळे पुण्यातील हॉटेल्ससारख्या आस्थापनांवर बंधने घालण्यापेक्षा त्यांच्या वेळा मुंबईप्रमाणे वाढवाव्यात म्हणून शासनाकडे मागणी केली आहे, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी सोमवारी दिली. तसेच, शहराची कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्ह्य़ाची उकल करूनच गुन्हेगारी कमी करण्यावर भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
इंडियन एक्सप्रेसच्या वतीने आयोजित ‘आयडिया एक्सचेंज’ कार्यक्रमात पाठक बोलत होते. त्यांनी शहराची कायदा सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, वाहतूक, सायबर गुन्हे, महिलांची सुरक्षितता अशा विविध विषयांवर विचारलेल्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली.
पाठक म्हणाले, की शहरात सध्या हॉटेल्ससारख्या आस्थापना रात्री साडेबारापर्यंत पूर्णपणे बंद करावे, असे आदेश आहेत. मात्र, अलिकडे पुणे शहराचा विकास वेगाने होत आहे. या ठिकाणी रात्री दोन-दोन वाजेपर्यंत नागरिक रात्रपाळी करून कामावरून घरी येतात. रस्त्यावर नागरिकांची वर्दळ असेल तर गुन्हे देखील कमी घडतात. तसेच, या ठिकाणी विविध संस्कृतीमधून आलेल्या व्यक्ती राहतात. त्यामुळे या ठिकाणच्या आस्थापनांना मुंबईप्रमाणे रात्री अडीचपर्यंत सुरू ठेवायला परवानगी द्यावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
शहरातील वाढत्या जबरी चोरी व साखळी चोरीच्या घटनांबाबत बोलताना पाठक म्हणाले, की साखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. काही घटनांना अभ्यास केल्यानंतर साखळी चोरी करणारे ९० टक्के गुन्हेगार हे सराईत असून दहा टक्के गुन्हेगार हे स्थानिक असल्याचे समोर आहे. साखळीचोरांना पकडूनच हे गुन्हे कमी करण्यावर पोलिसांचा भर राहणार आहे. शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी महत्त्वाच्या चौकात सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन तास अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतुकीच्या नियमाला प्राधान्य राहील. त्यानंतर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील गुन्हे रोखण्यासाठी गुन्हे उघडकीस आणणे हा सर्वात महत्त्वाचा पर्याय आहे. पुण्यात गुन्हे उघडकीस आणणारे अनेक चांगले अधिकारी आहेत. शहरातील गुन्हेगारी टोळ्या मोडीत काढण्यासाठी आतापर्यंत पाच ते सहा टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई केली आहे. या टोळ्यांची स्थानिक भागात खूप दहशत होती. त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर नागरिकांकडून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. या टोळ्यांना शिक्षा होण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातील, असे पाठक म्हणाले.
 पुढील महिन्यात पुण्यातील सीसीटीव्ही सुरू
शहरातील सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे आता पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. या सीसीटीव्हीचे उद्घाटन पुढील महिन्यात केले जाणार आहे, असे पोलीस आयुक्त पाठक यांनी सांगितले.