गेल्या आठ महिन्यांमध्ये पुणे पोलिसांनी शहरातून ६३ अग्निशस्त्र जप्त केली असून त्यामध्ये १८ ते २५ वयोगटातील तरुण सहभागी असल्याचे दिसून आले आहे. लवकर श्रीमंत होणे, शस्त्र जवळ असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण आहे, त्या भागात दरारा निर्माण करणे, अशा विविध कारणांसाठी तरुण स्वत:कडे अग्निशस्त्र बाळगत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या गुंडा विरोधी पथकाने सोमवारी सिंहगड रोड परिसरातून सात व्यक्तींना अटक करीत त्यांच्याकडून चार अग्निशस्त्र व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांची पोलिसांनी धडपकड सुरू केली आहे. अवैधपणे शस्त्र बाळगताना आढळून आल्यास ते जप्त करून त्यांना अटक केली आहे. गेल्या आठ महिन्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गावठी कट्टे, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर अशी ६३ अग्निशस्त्रे जप्त केली आहेत. या प्रकरणी ५१ गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये ७९ आरोपींना अटक केली आहे. तर गेल्या वर्षी (२०१४) ११३ गुन्हे दाखल करीत १४० अग्निशस्त्रे जप्त केली होती. त्यामध्ये १७३ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३२७ जिवंत काडतुसे जप्त केली होती. या गुन्ह्य़ात अटक केलेल्या आरोपींमध्ये १८ ते २५ वयोगटातील तरुण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. अग्निशस्त्र वापर करणाऱ्या गुन्हेगारांवर गुन्हे शाखेच्या पोलिसांची नजर असून आखणी काही गुन्हेगारांना लवकरच पकडले जाईल, अशी माहिती शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात येणारी अग्निशस्त्र ही मुख्यत्वेकरून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातून येतात. या ठिकाणाहून तस्करी करून आणलेली शस्त्रास्त्रे शहरातील सराईत गुन्हेगारांना पंधरा हजारांपासून ते ८० हजारांपर्यंत विकली जातात. ही शस्त्र लपवून आणण्यास सोपी असल्यामुळे घेऊन येताना पकडले जात नाहीत. शहरात अलीकडे तरुणांमध्ये शस्त्रांविषयी क्रेझ निर्माण झाली आहे. कमी वेळात अधिक पैसा मिळविण्यासाठी तरुण पिस्तूलचा धाक दाखवून गुन्हे करतात. त्याबरोबरच परिसरात दहशत निर्माण करून ‘दादा’ होण्यासाठी पिस्तुलाचा वापर केला जातो. तसेच, अनेकजण भितीपोटी अशी शस्त्रास्त्र जवळ बाळगत असल्याचे आढळून आले आहे. शस्त्रास्त्र निर्माण होणाऱ्या राज्यात जाऊन कारवाई करण्याचा पोलिसांकडून बऱ्याच वेळा प्रयत्न झाला. पण, स्थानिक पातळीवर सहकार्य मिळत नसल्यामुळे शस्त्रास्त्र बनविणाऱ्यांना पकडणे अवघड जाते. मात्र, अलीकडे शहरात अग्निशस्त्राचा वापर वाढत असल्याचे दिसून येत आहे.