५५० तक्रारींपैकी फक्त ४५ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल
एटीएम खात्यातून पैसे लंपास करणे, लॉटरी लागल्याच्या आमिषाने फसवणूक, क्रेडिट कार्डचा सांकेतिक शब्द चोरून त्याद्वारे खरेदी करणे, फेसबुकवर बनावट खाते उघडून बदनामी करणे किंवा अश्लील मजकूर टाकणे अशा अनेकविध तक्रारी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे नागरिकांकडून केल्या जात आहेत. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे गेल्या पाच महिन्यांत अशा प्रकारच्या ५५० तक्रारी आल्या आहेत. सायबर गुन्हे शाखेकडून त्यापैकी १९२ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्याच्या सूचना स्थानिक पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र स्थानिक पोलिस गुन्हा दाखल करण्यात चालढकल करत असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे शहरात गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्य़ांचा टक्का वाढत आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात पुणे शहर आघाडीवर आहे. तसेच पुणे शहरात मोठय़ा संख्येने परराज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. काही वर्षांपूर्वी समाजमाध्यमांचा वापर फक्त विशिष्ट वर्गाकडून केला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमांचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्य़ांच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई आणि पुणे शहरात दाखल होणाऱ्या सायबर गुन्ह्य़ांच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असून त्या तुलनेत राज्यातील अन्य शहरात सायबर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण तसे कमी आहे, असे निरीक्षण पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याने नोंदविले.
यंदा जानेवारीपासून पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे विविध प्रकारच्या फसवणुकीप्रकरणातील साडेपाचशे तक्रार अर्ज आले आहेत. सायबर गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी या तक्रारींचे विश्लेषण केले. त्यात १९२ तक्रारी या सायबर गुन्ह्य़ांमध्ये मोडत असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी सूचना स्थानिक पोलिस ठाण्यांना दिल्या. प्रत्यक्षात स्थानिक पोलिसांनी गेल्या पाच महिन्यांत फक्त ४५ गुन्हे दाखल केले आहेत. सायबर गुन्हे दाखल करण्यात स्थानिक पोलिसांनी बेफिकिरी दाखविली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांकडे अन्य जबाबदाऱ्या असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात चालढकल होत असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सायबर गुन्ह्य़ांच्या प्रकरणात गुन्हा कशा पद्धतीने दाखल करायचा आणि पुढील तपास कशा पद्धतीने करायचा याची पुरेशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांना नसल्याने अशा प्रकरणात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी असावे, असेही मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.

बँकाकडून सहकार्य नाही
पे-एटीएम, पे-यू अशा अ‍ॅपचा वापर करून पैसे भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या माध्यमातून फसवणूक झाल्यास तातडीने सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केल्यास पैसे परत मिळू शकतात. मात्र, फसवणूक करून खात्यातून पैसे काढून घेतल्याच्या प्रकरणांमध्ये बँका सहकार्य करत नाहीत, अशी माहिती सायबर गुन्हे शाखेकडून देण्यात आली.